‘वंदे मातरम्’चे दोन तुकडे केले नसते तर देशाची फाळणी झाली नसती, अमित शाहांची नेहरूंवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 17:07 IST2025-12-09T17:03:36+5:302025-12-09T17:07:01+5:30
Amit Shah News: राज्यसभेत ‘वंदे मातरम’ या गीतावर राज्यसभेमध्ये चर्चा सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वरच्या सभागृहात चर्चेला सुरुवात करताना प्रियंका गांधींसह विरोधी पक्षातील इतर नेत्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

‘वंदे मातरम्’चे दोन तुकडे केले नसते तर देशाची फाळणी झाली नसती, अमित शाहांची नेहरूंवर टीका
लाखो स्वातंत्र्य सैनिकांचं प्रेरणास्थान असलेल्या वंदे मातरम् या गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्ताने कालपासून संसदेमध्ये या गीतावर चर्चा सुरू आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत या चर्चेची सुरुवात करताना देशाचे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसवर टीका केली होती. त्यानंतर विरोधी पक्षातील सदस्यांनीही वंदे मातरम वरून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आज राज्यसभेत ‘वंदे मातरम’ या गीतावर राज्यसभेमध्ये चर्चा सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वरच्या सभागृहात चर्चेला सुरुवात करताना प्रियंका गांधींसह विरोधी पक्षातील इतर नेत्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
अमित शाह म्हणाले की, आज वंदे मातरमवर चर्चा करण्याची आवश्यकता का आहे? असा प्रश्न काही सदस्यांनी उपस्थित केला आहे. मात्र देशाच्या आत्म्याशी संबंधित या घोषणेची प्रासंगिकता आधीही होती. आजही आहे आणि येणाऱ्या काळातही कायम राहणार आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.
त्यानंतर अमित शाह यांनी वंदे मारतम या गीतामधूक काही पंक्ती गाळण्याच्या निर्णयावर टीका करत जवाहरलाल नेहरूंवर निशाणा साधला. त्याकाळात जर या राष्ट्रीय गीताला लांगुलचालनाच्या नावाखाली दोन तुकड्यात विभागले गेले नसते तर कदाचित देशाची फाळणीही झाली नसती. १९३७ साली जवाहरलाल नेहरू यांनी वंदे मातरम हे गीत दोन कडव्यांपुरतं मर्यादित ठेवण्याचा घेतलेला निर्णय ही लांगूलचालनाची सुरुवात होती, असा आरोपही अमित शाह यांनी केला.