IAS officer Rajiv Bansal appointed Chairman and Managing Director of Air India. | एअर इंडियाच्या 'टेक ऑफ'साठी नवा 'पायलट'; अध्यक्षपदी ज्येष्ठ IAS अधिकारी

एअर इंडियाच्या 'टेक ऑफ'साठी नवा 'पायलट'; अध्यक्षपदी ज्येष्ठ IAS अधिकारी

नवी दिल्ली - आर्थिक संकटात सापडलेल्या एअर इंडियाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ आयएएस अधिकारी राजीव बन्सल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बन्सल हे १९८८ नागालँड कॅडर बॅचमधील आयएएस अधिकारी आहेत. सध्या राजीव बन्सल हे पेट्रोलिअम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयात अतिरिक्त सचिव पदावर कार्यरत आहेत. 

केंद्रीय मंत्रिमंडळ निवड समितीने राजीव बन्सल यांच्या एअर इंडिया अध्यक्षपदाच्या नियुक्तीला हिरवा कंदील दाखवला. विद्यमान अध्यक्ष अश्विनी लोहानी यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर बन्सल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

आर्थिक अडचणीत असलेल्या एअर इंडियाचे शंभर टक्के शेअर्स विकण्याचे केंद्र सरकारने अलीकडेच अर्थसंकल्पात जाहीर केलं आहे. त्यासाठी १७ मार्चपर्यंत निविदा मागवण्यात आल्या आहेत. एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला होता. 

सूत्रांच्या माहितीनुसार टाटा समूह सिंगापूर एअरलाइन्सच्या सहकार्याने एअर इंडियासाठी बोली लावण्याच्या तयारीत आहे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनी मिळून ही बोली लावण्यासाठी काम सुरू केले आहे. १९३२ मध्ये जेआरडी टाटाने एअर इंडियाचा पाया रचला होता आणि १९४६ मध्ये त्याचे राष्ट्रीयकरण झाले. सुरुवातीला ते टाटा एअरलाइन्स म्हणून ओळखले जात होते, राष्ट्रीयकरणानंतर १९४८ मध्ये त्याला एअर इंडिया असं नाव देण्यात आले. आता ही विमान कंपनी पुन्हा एकदा टाटाच्या समुहात परतू शकते. टाटा ग्रुप एअर इंडिया विकत घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामध्ये एअर एशिया इंडियाचे विलीनीकरण (टाटाचे यात 51% भागभांडवल आहे) आणि एअर इंडियाची 100% उपकंपनी एअर इंडिया एक्सप्रेसचा समावेश आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IAS officer Rajiv Bansal appointed Chairman and Managing Director of Air India.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.