सोनिया गांधीच राहणार वर्षभर काँग्रेस अध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 05:29 AM2021-10-17T05:29:18+5:302021-10-17T05:30:25+5:30

पक्षाध्यक्ष पदाबाबत विचार करीन -राहुल गांधी

I am full time hands on Congress president says Sonia at CWC meet | सोनिया गांधीच राहणार वर्षभर काँग्रेस अध्यक्ष

सोनिया गांधीच राहणार वर्षभर काँग्रेस अध्यक्ष

Next

नवी दिल्ली : राहुल गांधीकाँग्रेसचे अध्यक्ष व्हावेत, असे पक्षातील प्रत्येकाला वाटत आहे. याबाबत पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत नेत्यांनी केलेल्या मागणीवर आपण विचार करू, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ही माहिती काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी यांनी पत्रकारांना दिली. काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये पूर्ण होईल. त्यामुळे सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी आणखी वर्षभर राहतील हे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेस कार्यकारिणीच्या शनिवारी झालेल्या बैठकीनंतर अंबिका सोनी यांनी सांगितले की,  राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष व्हावेत यावर पक्षातील सर्वांचे एकमत आहे. पण, त्याबाबतचा निर्णय राहुल गांधी यांनीच घ्यायचा आहे. पक्षातील संघटनात्मक निवडणुका होईपर्यंत राहुल गांधी यांना हंगामी अध्यक्ष करावे, अशी मागणी काही काँग्रेस नेत्यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत केली. लखीमपूर खेरीमध्ये झालेली शेतकऱ्यांची हत्या हे मोदी सरकारच्या अहंकारी प्रवृत्तीचे निदर्शक आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. 

निवडणूक प्रक्रिया पुढील वर्षी
काँग्रेसचा नव्या पूर्णवेळ अध्यक्षाच्या निवडणुकीची प्रक्रिया पुढील वर्षी २१ ऑगस्ट ते २० सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. तसेच पक्षातील खजिनदार, उपाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, प्रदेश काँग्रेस समितीचे सदस्य यांची निवड करण्यासाठीही याच कालावधीत पक्षांतर्गत निवडणुका होणार आहेत. तसेच येत्या १ नोव्हेंबरपासून ते पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंत काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणीसाठी देशव्यापी मोहीम हाती घेणार आहे, अशी माहिती सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली. 

Web Title: I am full time hands on Congress president says Sonia at CWC meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.