hyderabad gang rape the wife of the accused said husband is dead government should gave job and 10 lakh rupees | सरकारी नोकरी अन् 10 लाख रुपये द्या; हैदराबाद एन्काऊंटरमधल्या आरोपीच्या पत्नीची मागणी
सरकारी नोकरी अन् 10 लाख रुपये द्या; हैदराबाद एन्काऊंटरमधल्या आरोपीच्या पत्नीची मागणी

तेलंगणाः हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेनं देशभरात खळबळ उडाली. पोलिसांनी त्या नराधमांचं एन्काऊंटर केल्यानंतर बरेच वादविवाद रंगले होते. काहींनी आरोपींचं केलेलं एन्काऊंटर योग्य असल्याचं सांगितलं. तर काहींनी अशा घटनांमुळे न्याय व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडेल, अशीही मल्लिनाथी केली. त्यातच आता एन्काऊंटरमध्ये ठार करण्यात आलेल्या आरोपीच्या पत्नीनं सरकारी नोकरी आणि 10 लाख रुपयांची मागणी केली आहे. तसेच त्या आरोपींचे मृतदेह कधी सोपवणार आहेत, यासंदर्भातही कुटुंबीयांनी विचारणा केली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्येतला आरोपी  चिन्नाकेशवुलुच्या गर्भवती पत्नीनं सांगितलं की, मी आता माझ्या पतीला मागत नाही. आता त्याचा मृत्यू झालेला आहे. पण जर सरकारनं मला माझ्या गावात रोजगार उपलब्ध करून दिल्यास मी माझ्या आणि कुटुंबीयांच्या गरजा पूर्ण करू शकेन. तसेच आरोपींच्या आई-वडिलांनाही एकुलता एक मुलगा गमावल्याची भावना व्यक्त केली आहे. आता सरकारनं त्यांना एक प्लॅट आणि 10 लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून द्यावेत, अशी मागणी आरोपीच्या कुटुंबीयांनी केली आहे. आरोपींचे मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याचंही कुटुंबीयांनी सांगितलं. तसेच आरोपींचे मृतदेह अद्यापही शवागारात ठेवण्यात आले असून, न्यायालयाच्या आदेशानंतरच ते कुटुंबीयांना सोपवण्यात येणार आहेत.

हैदराबादमध्ये 27 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. दरम्यान, या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी शुक्रवारी एन्काऊंटर  केला. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला. अधिक तपासासाठी आरोपींना घटनास्थळी  नेण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांच्या तावडीतून या आरोपींनी निसटण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही ते पळून जात होते. अखेर पोलिसांनी गोळीबार केला. त्यात या चारही आरोपींचा मृत्यू झाला. 
 

Web Title: hyderabad gang rape the wife of the accused said husband is dead government should gave job and 10 lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.