मोठी दुर्घटना! लग्न समारंभात आनंदाने नाचत होते लोक, अचानक कोसळलं घर; २५ महिला जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 16:22 IST2025-12-07T16:22:36+5:302025-12-07T16:22:58+5:30
एका लग्न समारंभादरम्यान मातीचं घर अचानक कोसळलं, ज्यामध्ये २० ते २५ महिला जखमी झाल्या.

फोटो - ABP News
हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली. चुरा उपविभागातील जांगरा ग्रामपंचायतीच्या शावा गावात एका लग्न समारंभादरम्यान मातीचं घर अचानक कोसळलं, ज्यामध्ये २० ते २५ महिला जखमी झाल्या. सर्व जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून तीसा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवार, ६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता घडली आणि त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे.
घटनेच्या वेळी महिला पारंपारिक लग्नाच्या नृत्यात सहभागी झाल्या होत्या. पाहुणे आले होते. अचानक मातीच्या घराचा एक खांब तुटला, ज्यामुळे संपूर्ण छत कोसळलं, महिला गाडल्या गेल्या आणि अनेक जण गंभीर जखमी झाले. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये महिला नाचत असल्याचं दिसून आलं आहे. कोसळल्यानंतर आरडाओरडा सुरू झाला आणि स्थानिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केलं.
दुर्घटनेनंतर काही मिनिटांतच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि सर्व जखमींना तीसा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. रुग्णालय प्रशासनाने सांगितलं की जखमींवर उपचार सुरू आहेत. स्थानिक रहिवाशांच्या तत्परतेमुळे अडकलेल्यांना तातडीने वाचवण्यात आलं. आतापर्यंत कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे. गावकऱ्यांनी सांगितलं की घर खूप जुनं आणि कच्चं होतं आणि त्यामुळे ते भार सहन करू शकत नव्हतं.
एसडीएम चुराह, राजेश कुमार जरीयाल यांनी घटनेची पुष्टी केली आणि सांगितलं की प्रशासकीय पथक घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे. जखमींना त्यांच्या स्थितीनुसार त्वरित मदत दिली जाईल. एसडीएमने असं सांगितलं की चौकशीनंतर घराची रचना आणि सुरक्षितता याबाबत पुढील कारवाई केली जाईल. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने जुन्या आणि कच्च्या घरांमध्ये मोठे कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी सुरक्षितता मानके तपासण्याचे आवाहन जनतेला केले आहे.