HighHoltage Drama at Chidambaram's house;CBI official jumps the gate of P Chidambaram's residence to get inside | Video: चिदंबरम यांच्या घरी हायव्होल्टेज ड्रामा; गेटवरुन उड्या मारुन सीबीआय अधिकारी घरात दाखल 
Video: चिदंबरम यांच्या घरी हायव्होल्टेज ड्रामा; गेटवरुन उड्या मारुन सीबीआय अधिकारी घरात दाखल 

नवी दिल्ली - आयएनएक्स प्रकरणात आरोप असलेले देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकेसाठी सीबीआय टीम त्यांच्या घरी पोहचली. यावेळी चिदंबरम यांच्या निवासस्थानाचा गेट न उघडल्याने सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी गेटवरून उड्या मारून घरात घुसण्याचा प्रयत्न केला. जोरबाग येथील चिदंबरम यांच्या निवासस्थानाबाहेर अनेक माध्यमांचे प्रतिनिधी, पोलीस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. 

२७ तासांनंतर बेपत्ता झालेले पी. चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना पी. चिदंबरम यांनी आयएनएक्स प्रकरणात मी कधीही आरोपी नव्हतो. माझ्यावर कोणतंही आरोपपत्र दाखल झालं नाही असा दावा केला आहे. ही पत्रकार परिषद संपल्यानंतर पी. चिदंबरम हे जोरबाग येथील त्यांच्या निवासस्थानी पोहचले. त्यानंतर काही वेळातच सीबीआयची टीमही त्यांच्या घरी दाखल झाली. 

सीबीआय किंवा ईडीने कोणतंही आरोपपत्र दाखल केलेलं नाही, माझा मुलभूत हक्क हिरावला जातोय. मागील २७ तासांपासून अनेक भ्रम पसरविले जात आहेत. मी आणि माझं कुटुंब यात दोषी नाही. कोणत्याही आरोपपत्रात माझं नाव नाही. सुप्रीम कोर्टात याबाबत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. शुक्रवारी याबाबत सुनावणी होईल. गेल्या २७ तासांत वकिलांसोबत पुढील लढण्याची तयारी करत होतो. रात्रभर कागदपत्रे तयार केली जात होती. तपास यंत्रणांही कायद्याचं पालन केलं पाहिजे असं चिदंबरम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

तसेच ईडीने चिदंबरम यांच्याविरोधात काढलेली लुकआऊट नोटीस रस्ते परिवहन, हवाई दल आणि नौदलाला पाठवली आहे. त्यात चिदंबरम यांना ईडीच्या परवानगी शिवाय भारताबाहेर जाण्याची परवानगी न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काल सायंकाळपासून चिदंबरम यांचा कुठेच पत्ता लागत नाही. त्यामुळे ईडीने चिदंबरम यांचा शोध सुरू ठेवला होता. धक्कादायक म्हणजे चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनी आयएनएक्स घोटाळ्यात मिळालेल्या लाचेच्या रकमेतून स्पेनमध्ये एक टेनिस क्लब आणि अमेरिकेत बंगला खरेदी केला आहे. त्याशिवाय कार्तीने देश-विदेशात अनेक ठिकाणी मालमत्ता खरेदी केली. याप्रकरणी चिदंबरम यांना ताब्यात घेऊन ईडीला त्यांची चौकशी करायची आहे. त्यामुळे अनेक नाट्यमय घडामोडी सध्या दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानाबाहेर घडत आहे.  
 


Web Title: HighHoltage Drama at Chidambaram's house;CBI official jumps the gate of P Chidambaram's residence to get inside
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.