हरियाणामध्ये मुख्यमंत्री मनोहर खट्टरांसमोर बहुरंगी आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 02:24 AM2019-09-22T02:24:06+5:302019-09-22T02:24:43+5:30

भाजपचे मिशन ७५; काँग्रेस, आयएनएलडी, जननायक जनता पार्टी, आप मैदानात

Haryana faces a multi-faceted challenge to Chief Minister Manohar Khattar | हरियाणामध्ये मुख्यमंत्री मनोहर खट्टरांसमोर बहुरंगी आव्हान

हरियाणामध्ये मुख्यमंत्री मनोहर खट्टरांसमोर बहुरंगी आव्हान

Next

महाराष्ट्रासोबत हरियाणा राज्याची निवडणूक जाहीर झाली असून, ९० जागांवर २१ आॅक्टोबरला मतदान होणार आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत २०१४ मध्ये भाजपने पहिल्यांदा हरियाणात सत्ता मिळविली आहे. ही सत्ता कायम राखण्याचे आव्हान मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासमोर असणार आहे. त्यांना काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांच्यासह चार प्रमुख पक्षांचा सामना करावा लागणार आहे.

२०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे भाजपने चार जागांवरून ४७ जागांवर हनुमान उडी घेऊन सत्ता मिळविली. ओमप्रकाश चौटाला यांच्या इंडियन नॅशनल लोकदलाला (आयएनएलडी) १९ जागा, तर काँग्रेसला अवघ्या १५ जागांवर समाधान मानावे लागले. सलग दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या भूपिंदरसिंह हुडा यांना सत्तेतून बाहेर व्हावे लागले. २०१९ च्या निवडणुकीसाठी भाजपने मिशन ७५ चा नारा दिला असून, त्यादृष्टीने त्यांनी प्रचार सुरू केला आहे. पण, यावेळी भाजपला काँग्रेससोबत आयएनएलडी व जननायक जनता पार्टी (आयएनएलडीमध्ये फूट पडून तयार झालेला पक्ष ) बसप, आप, स्वराज इंडिया पार्टी या पक्षांचादेखील सामना करावा लागणार आहे. त्यामुळे यंदा हरियाणामध्ये बहुरंगी लढती होण्याची चिन्हे आहेत. भाजपने इतर पक्षांसोबत हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला फारसे यश आले नाही. अजय चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीसोबत युती करण्याचा प्रयत्न झाला, पण तो अर्धवट राहिला.

लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला होता. १० पैकी १० जागा भाजपने पटकावल्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आली. माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांनी पक्षापासून फारकत घेत सवतासुभा मांडण्याचा प्रयत्न केला; पण काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी खास करून सोनिया गांधी यांनी यावर तोडगा काढून विधानसभा नेतेपदी हुडा यांची नेमणूक केली. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी शैलजा कुमारी यांची नेमणूक करून डागडुजी केली. त्यामुळे लोकसभेनंतर बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेसमध्ये नव्या बदलामुळे चैतन्य निर्माण होऊन भाजपसमोर आव्हान निर्माण केले आहे. हरियाणाच्या राजकारणात जाट मतदार महत्त्वाचा घटक असून, त्यांच्या भोवती राजकारण चालते. जाट मतदार यावेळी कोणाच्या पाठीशी राहणार यावर सत्तेचे गणित अवलंबून राहणार आहे.

इतर पक्षांमध्ये बसपने राज्यातील १७ आरक्षित जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. या जागांपैकी जास्त जागा मिळवून सत्तेच्या दावेदारीत आपली भूमिका वाढविण्याचे नियोजन बसप करीत आहे. आयएनएलडीला लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षात झालेल्या फुटीचा जबर फटका बसला. लोकसभेच्या दोन्ही जागा त्यांना गमवाव्या लागल्या. डिसेंबर २०१८ मध्ये दुष्यंत चौटाला यांनी स्थापन केलेल्या जननायक जनता पार्टीचेदेखील यावेळी प्रमुख आव्हान असणार आहे. आप व स्वराज इंडिया पार्टीदेखील विधानसभेत आपले नशीब अजमावणार आहे. ‘आप’ने लोकसभेला जननायक पार्टीसोबत आघाडी करून निवडणूक लढविली होती.

भाजपची लोकसभेतील कामगिरी
सर्वच्या सर्व १० जागा जिंकल्या
एकूण ५८ टक्के मतदान मिळविले
७९ विधानसभा मतदारसंघांत आघाडी
१० मतदारसंघांत काँग्रेसला आघाडी

प्रमुख मुद्दे
कलम ३७० रद्द करणे
राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर
जाटेतर मुख्यमंत्री
आर्थिक मंदी, शेतकऱ्यांचे प्रश्न
गुडगाव परिसरातील उद्योगांना मंदीचा फटका

माजी मुख्यमंत्री हुडा यांनी पक्षापासून फारकत घेत सवतासुभा मांडण्याचा प्रयत्न केला; पण काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी खास करून सोनिया गांधी यांनी यावर तोडगा काढून विधानसभा नेतेपदी हुडा यांची नेमणूक केली.

Web Title: Haryana faces a multi-faceted challenge to Chief Minister Manohar Khattar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.