दिल्ली बॉम्बस्फोटाचं हमास कनेक्शन! हल्ल्यासाठी ड्रोन वापरायचा कट; दहशतवादी दानिशच्या फोनमधून मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 11:51 IST2025-12-02T11:50:02+5:302025-12-02T11:51:10+5:30
राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केलेल्या दहशतवादी दानिशच्या फोनची तपासणी केल्यावर अनेक गुप्त गोष्टी उघडकीस आल्या आहेत.

दिल्ली बॉम्बस्फोटाचं हमास कनेक्शन! हल्ल्यासाठी ड्रोन वापरायचा कट; दहशतवादी दानिशच्या फोनमधून मोठा खुलासा
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासात आता एक अत्यंत गंभीर माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केलेल्या दहशतवादी दानिशच्या फोनची तपासणी केल्यावर अनेक गुप्त गोष्टी उघडकीस आल्या आहेत. दानिशच्या डिलीटेड हिस्ट्रीमध्ये हमास दहशतवादी संघटनेच्या धर्तीवर वापरल्या जाणाऱ्या डझनभर ड्रोनचे फोटो सापडले आहेत, ज्यामुळे देशात ड्रोन हल्ल्याची मोठी तयारी सुरू असल्याचा धोकादायक संकेत मिळत आहे.
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या भीषण कार बॉम्बस्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांनी 'व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल' उघडकीस आणण्यासाठी कंबर कसली आहे. या तपास मोहिमेत जम्मू-काश्मीरमधून अटक करण्यात आलेला दहशतवादी दानिश याची अनेक रहस्य आता उघड होत आहेत.
फोनमध्ये हमास पॅटर्नच्या ड्रोनचे फोटो!
राष्ट्रीय तपास यंत्रणेला दानिशच्या फोनच्या डिलीट हिस्ट्रीमधून अत्यंत महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दानिशच्या फोनमध्ये डझनभर ड्रोनचे फोटो मिळाले आहेत. हे ड्रोन हमास या दहशतवादी संघटनेच्या धर्तीवर तयार करण्यात आलेले आहेत. यावरून देशात मोठे ड्रोन हल्ले करण्याची भयानक योजना आखली जात होती, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
चौकशीदरम्यान दानिशने ड्रोन हल्ल्यासंदर्भात अनेक गुप्त गोष्टी सांगितल्या आहेत. दहशतवादी गट हलके आणि सुमारे २५ किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकतील, अशा क्षमतेचे ड्रोन बनवण्याच्या तयारीत होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. दानिशच्या फोनमध्ये केवळ ड्रोनचेच नव्हे, तर 'रॉकेट लॉन्चर'चेही काही फोटो मिळाले आहेत.
'ड्रोन बॉम्ब' बनवण्यात दानिश होता माहीर
NIAच्या तपासानुसार, दहशतवादी दानिश हा ड्रोन बॉम्ब बनवण्याच्या कामात माहीर होता. त्याच्या फोनमध्ये डझनभर व्हिडीओ सापडले आहेत, ज्यामध्ये ड्रोन बॉम्ब कसा तयार करायचा, याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. इतकंच नव्हे, तर ड्रोनमध्ये स्फोटके कशी बसवायची, यासंदर्भातील काही संशयास्पद व्हिडीओ देखील त्याच्याकडे होते. हे सर्व व्हिडीओ एका विशिष्ट ॲपद्वारे दानिशपर्यंत पोहोचवले जात होते, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. या ॲपमध्ये सामील असलेले काही परदेशी मोबाईल क्रमांक देखील एनआयएच्या रडारवर आले आहेत.
कोण आहे हा दहशतवादी दानिश?
जसीर बिलाल उर्फ दानिश याला एनआयएने १७ नोव्हेंबर रोजी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथून अटक केली. दानिश दिल्ली बॉम्बस्फोटाच्या सूत्रधारांपैकी एक असल्याचे म्हटले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड डॉ. उमर हा दानिशला आत्मघातकी बॉम्बर म्हणून तयार करत होता. लाल किल्ल्यावर हल्ला करण्याची त्याची योजना होती. काझीगुंड, अनंतनाग येथील रहिवासी असलेला दानिश हा डॉ. उमरला तांत्रिक मदत पुरवत होता.
दिल्ली स्फोट आणि दहशतवादी मॉड्यूल
१० नोव्हेंबर २०२५ रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये झालेल्या स्फोटात किमान १५ निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला, तर २० हून अधिक नागरिक जखमी झाले होते. या स्फोटामागे 'जैश-ए-मोहम्मद' आणि 'अंसार गजवात-उल-हिंद' यांसारख्या पाकिस्तानस्थित संघटनांशी संबंधित असलेल्या व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूलचा हात असल्याचे तपासात समोर आले आहे.