गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 13:42 IST2025-06-23T13:09:56+5:302025-06-23T13:42:31+5:30
Gujarat Assembly By Election 2025: भाजपाचा बालेकिल्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये विधानसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाने भाजपाला जबर धक्का दिला आहे.

गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
देशातील चार राज्यांतील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू असून, त्यामध्ये गुजरातमधील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या पोटनिवडणुकीत भाजपाचा बालेकिल्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने भाजपाला जबर धक्का दिला आहे. गुजरातमधील विसावदर विधानसभा मतदारसंघात आम आदमी पक्षाचे उमेदवार गोपाल इटालिया यांनी विजयी आघाडी घेतली आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर गोपाल इटालिया यांनी भाजपाचे उमेदवार किरीट पटेल यांच्यावर १७ हजार ५५४ मतांची निर्णायक आघाडी घेत विजय मिळवला आहे.
२०२२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतही विसावदर विधानसभा मतदारसंघात आम आमदी पक्षाचा विजय झाला होता. त्यावेळी आपचे भूपेंदरभाई भयाणी हे या मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली होती.
या पोटनिवडणुकीत भाजपाकडून किरीट पटेल यांनी उमेदवारी देण्यात आली होती. तर आम आदमी पक्षानो गोपाल इटालिया यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान, आज झालेल्या मतमोजणीमध्ये सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये दोन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत दिसत होती. मात्र मतमोजणीच्या उत्तरार्धात आम आदमी पक्षाच्या गोपाल इटालिया यांनी जोरदार मुसंडी मारत विजयी आघाडी घेतली.
दरम्यान, गुजरातमधील कडी विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार राजेंद्रकुमार चावडा यांनी विजयी आघाडी घेतली आहे. १९ फेऱ्यांरी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर राजेंद्र कुमार चावडा यांनी काँग्रेसचे उमेदवार रमेशभाई चावडा यांच्यावर ३८ हजार ६२४ मतांची आघाडी घेतली आहे.