प्रत्येक स्मार्टफोनमध्ये सरकारचे 'संचार साथी' ॲप; इच्छा असूनही डिलीट करता येणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 06:29 IST2025-12-02T06:26:38+5:302025-12-02T06:29:12+5:30
भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक नवीन स्मार्टफोनमध्ये सरकारने तयार केलेले 'संचार साथी' हे सायबर सुरक्षा ॲप प्रीइन्स्टॉल करावे लागणार आहे.

प्रत्येक स्मार्टफोनमध्ये सरकारचे 'संचार साथी' ॲप; इच्छा असूनही डिलीट करता येणार नाही
नवी दिल्ली : सर्व स्मार्टफोन उत्पादकांना भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक नवीन स्मार्टफोनमध्ये सरकारने तयार केलेले 'संचार साथी' हे सायबर सुरक्षा ॲप प्रीइन्स्टॉल करावे लागणार आहे. स्मार्टफोन वापरकर्त्यांची सायबर सुरक्षा करण्यासाठी तयार केलेले हे ॲप वापरकर्त्यांना अनइन्स्टॉल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. जे फोन आधीच बाजारात विक्रीला आहेत, त्यांच्यामध्येही सॉफ्टवेअर अपडेटद्वारे ॲप देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशाची कंपन्यांना पुढील ९० दिवसांत अंमलबजावणी करावी लागेल.
कोणत्या कंपन्यांसाठी हा नियम लागू होणार?
स्मार्टफोन निर्मात्यांना सर्व नवीन स्मार्टफोनमध्ये 'संचार साथी' ॲप इन्स्टॉल करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
हा नियम ॲपल आणि सॅमसंगपासून ते शाओमी, गुगल, ओप्पो, व्हिवो आणि इतर कंपन्यांनाही लागू आहे. ॲप पहिल्या वापरातच स्पष्टपणे दिसावे, ॲक्टिव्ह असावे आणि त्याच्या फीचर्सना अडथळा आणता येणार नाही, अशी स्पष्ट अट सरकारने घातली आहे.
सरकार काय म्हणते ?
२० दिवसांनंतर भारतात तयार होणाऱ्या किंवा आयात होणाऱ्या सर्व फोनमध्ये 'सारथी ॲप' आधीपासूनच प्रीइन्स्टॉल असणे आवश्यक आहे.
या संदर्भात कंपन्यांनी १२० दिवसांत अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. आयएमईआय क्रमांकाशी छेडछाड करणे अजामीनपात्र गुन्हा आहे.
साथी ॲप का महत्त्वाचे?
आयएमईआय नंबर गैरवापर तक्रारीसाठी हरवलेला फोन शोधण्यासाठी मदत फसवे कॉल्स, सिम-संबंधित गैरप्रकारांची नोंद