हिंदी पट्ट्याचा रोख ठरविणार सरकारचे भवितव्य; चार टप्पे सरकार स्थापनेसाठी महत्त्वाचे!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 03:02 AM2019-04-29T03:02:47+5:302019-04-29T03:03:17+5:30

बदललेल्या वातावरणाचा फायदा कोणाला । देशाच्या दक्षिण भागातील मतदान झाले पूर्ण; आता लक्ष उत्तरेतील राज्यांकडे; २४० पैकी १६२ जागा राखण्याचे भाजपपुढे आव्हान

Government's future will decide the cash of Hindi belt; Four steps are important for government formation. | हिंदी पट्ट्याचा रोख ठरविणार सरकारचे भवितव्य; चार टप्पे सरकार स्थापनेसाठी महत्त्वाचे!

हिंदी पट्ट्याचा रोख ठरविणार सरकारचे भवितव्य; चार टप्पे सरकार स्थापनेसाठी महत्त्वाचे!

Next

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित चार टप्प्यांमध्ये लोकसभेच्या ४४ टक्के जागांचा फैसला होणार आहे. या जागांमधील सुमारे ६७ टक्के जागा सध्या भाजपकडे आहेत. त्या जागा राखणे ही भाजपची प्राथमिकता आहे. त्याच वेळी गेल्या पाच वर्षांमध्ये बदललेल्या वातावरणाचा फायदा घेत, कॉँग्रेस, तसेच अन्य विरोधक भाजपच्या जागा खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे या उर्वरित टप्प्यांमध्ये होत असलेल्या जागांच्या निवडणुकीमधून देशात कोण सरकार स्थापन करणार, हे निश्चित होणार आहे. देशाच्या दक्षिण भागामधील मतदान पूर्ण झाले असून, आता जवळपास सर्वच जागा उत्तर भारतामधील म्हणजेच हिंदी भाषिक पट्ट्यातील आहेत.

राजस्थान : गेल्या लोकसभेवेळी भाजपने अन्य सर्व पक्षांना नेस्तनाबूत करीत सर्वच्या सर्व २५ जागा जिंकल्या होत्या.
महाराष्ट्र : चौथ्या टप्प्यामध्ये १७ जागांसाठी मतदान होत आहे. या सर्वच्या सर्व जागा भाजप-शिवसेना युतीकडे आहेत. यावेळी या सर्व राखण्यासाठी या दोन पक्षांना फारच प्रयत्न करावे लागणार आहेत. युतीच्या विरोधामध्ये कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अन्य पक्षांच्या जोडीने लढत आहे. सध्या युतीकडे राज्यातील ४८ जागांपैकी ४१ जागा युतीकडे असून, काँग्रेस-राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीकडे ७ जागा आहेत.

राजस्थान, मध्य प्रदेशातील सत्तांतराने गणित बिघडणार?
मध्य प्रदेश : गेल्या १५ वर्षांपासून असलेली भाजपची सत्ता कॉँग्रेसने मिळविली. या निवडणुकीत कॉँग्रेसला आणि भाजपला प्रत्येकी ४१ टक्के मते मिळाली. या आधीच्या (२०१३) निवडणुकीमध्ये भाजपला ४४.९ तर कॉँग्रेसला ३६.४ टक्के मते मिळाली होती.
राजस्थान : विधानसभेमध्ये कॉँग्रेसने विजय मिळविला. येथेही कॉँग्रेसच्या मतांची टक्केवारी पाच टक्क्यांहून अधिक वाढली, भाजपची मते ७.४० टक्क्यांनी घटली. राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांत मागील लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळाले होते.

मोदी करू शकतात अनेक रॅली, रोड शो
लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित तीन टप्प्यांमध्ये भाजपकडे असलेल्या जागा राखण्यासाठी भाजपला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यामुळेच भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या टप्प्यांमधील मतदारसंघांमध्ये अनेक प्रचार रॅली काढू शकतील. ते ७० ते ८० रॅलीज काढतील, तसेच सुमारे २० रोड शो करतील, असा अंदाज आहे. यामार्फत ते या मतदारसंघांमधील वातावरण ढवळून काढीत भाजपच्या विजयासाठी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा आहे. गुरुवारी वाराणसीमध्ये झालेल्या रोड शोने मोदी यांनी आपल्या आगामी प्रचाराची चुणूकच दाखविली आहे.

रॅलींमध्ये राहुल गांधी पुढे
देशभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विविध राज्यांमध्ये रॅली आणि रोड शो याद्वारे प्रचाराचा धडाका लावला आहे. यामध्ये राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना मागे टाकलेले दिसते. राहुल गांधी यांनी ११ मार्चपासूनच रॅलींना प्रारंभ केला आहे. त्यांनी आतापर्यंत ८५ रॅली काढल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक अधिसूचना जारी झाल्यानंतर २८ मार्च रोजी रॅली काढण्यास प्रारंभ केला. त्यांनी गुरुवारपर्यंत ७९ रॅली काढल्या आहेत. त्यामुळे रॅलींच्या संख्येमध्ये ते पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा पुढे आहेत.

चौथ्या टप्प्यात गाजलेले मुद्दे
चौथ्या टप्प्यातील प्रचारात साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य, त्यावर काँग्रेस व इतर पक्षांतील नेत्यांनी केलेली टीका, गौतम गंभीर यांच्या दुहेरी ओळखपत्राचा मुद्दा आणि निवडणूक आयोगानी त्याला बजावलेली नोटीस, अमेठीत स्मृती इराणी यांनी चप्पल वाटल्याप्रकरणी प्रियांका गांधी यांनी केलेली टीका हे मुद्दे प्रामुख्याने होते. याशिवाय साध्व प्रज्ञासिंह, नवज्योतसिंग सिध्दू, सत्पाल साठी यांना आचारसंहिता भंगाची दिलेली नोटीस, तसेच नरेंद्र मोदी यांच्यावरील मालिकेला दिलेली स्थागिती हे या टप्प्यात गाजलेले मुद्दे होते.

उत्तर प्रदेश : जागा राखण्याची भाजपची धडपड
चौथ्या टप्प्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये १३ जागांसाठी मतदान होत असून, या सर्व जागा बुंदेलखंडातील आहेत. या भागामध्ये समाजवादी पार्टीने चांगली मुळे रोवलेली असली, तरी मागील निवडणुकीत येथील एक जागा वगळता बाकी सर्व जागांवर भाजपने विजय मिळविलेला आहे. या परिसरामध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा महत्त्वाचा आहे. यावेळी सपा आणि बसपा युती असल्याने भाजपला विजयासाठी अधिकच झुंजावे लागण्याची चिन्हे आहेत. मागील निवडणुकीमध्ये मोदी लाटेने भाजपला उत्तर प्रदेशामध्ये भरभरून जागा मिळाल्या.

यंदा परिस्थिती अवघड
यंदा मात्र अशी कोणतीही लाट नाही, शिवाय नोटाबंदी, जीएसटी आदी विविध कारणांनी जनता त्रस्त आहे. त्यातच उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्ष यांनी युती केल्याने मतविभागणी कमी होणार आहे. या सर्व कारणांमुळे भाजपला आपल्या जागा राखताना कसरत करावी लागणार आहे.

Web Title: Government's future will decide the cash of Hindi belt; Four steps are important for government formation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.