IndiGo: सरकारचा इंडिगो एअरलाइन्सला दणका, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 14:53 IST2025-12-09T14:50:49+5:302025-12-09T14:53:05+5:30
IndiGo Flight Schedule Cut: मुंबईसह देशातील प्रमुख विमानतळांवर इंडिगो एअरलाइन्सच्या उड्डाण वेळापत्रकात ५ टक्के कपात करण्यात आली.

IndiGo: सरकारचा इंडिगो एअरलाइन्सला दणका, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय
मुंबईसह देशातील प्रमुख विमानतळांवर इंडिगो एअरलाइन्सच्या कामकाजात सातत्याने येत असलेल्या अडथळ्यांमुळे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सरकारने इंडिगोच्या हिवाळी उड्डाण वेळापत्रकात ५ टक्के कपात करण्याचे आदेश दिले. याबाबतची माहिती केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी दिली.
नवीन फ्लाइट ड्युटी टाइम नियम आणि क्रू मेंबर्सच्या कमतरतेमुळे इंडिगो एअरलाइनच्या उड्डाणांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यत्यय येत आहे. यामुळे विमानतळांवर गोंधळ निर्माण होऊन लाखो प्रवासी अडकले आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने इंडिगोला स्पष्टपणे निर्देश दिले आहेत की, जोपर्यंत त्यांचे कर्मचारी आणि कामकाज स्थिर होत नाही, तोपर्यंत त्यांनी कपात केलेल्या वेळापत्रकानुसारच काम करावे. कपात करण्यात येणाऱ्या उड्डाणांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.
इंडिगोमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी डीजीसीएने एअर इंडिया, अकासा एअर आणि स्पाइसजेटसारख्या विमान कंपन्यांना त्यांच्या उड्डाणामध्ये वाढ करण्याचे आवाहन केले. एअर इंडियाने अधिक प्रवाशांना सामावून घेण्यासाठी देशांतर्गत मार्गांवर वाइड-बॉडी विमाने तैनात करण्यास सुरुवात केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गैरसोयीच्या काळात खासगी विमान कंपन्यांकडून होणारी भाड्याची लूट थांबवण्यासाठी डीजीसीएने भाडे नियंत्रण लागू केले. ५०० किमी पर्यंतच्या तिकिटांची किंमत जास्तीत जास्त ७,५०० रुपये आणि १,००० ते १,५०० किमी पर्यंतच्या अंतरासाठी, तिकीटांची किंमत १५,००० रुपये असू शकते.