बनावट कागदपत्रं दाखवून लाटली सरकारी नोकरी, १० वर्षांनंतर फुटलं बिंग, स्टाफ नर्सवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 14:49 IST2025-12-07T14:49:02+5:302025-12-07T14:49:29+5:30
Uttar Pradesh Fraud News: उत्तर प्रदेशमधील बलिया येथील रसडा सामुदायिक आरोग्य केंद्रात तैनात असलेल्या एका स्टाफ नर्सवर गंभीर आरोप झाले आहेत. या स्टाफ नर्सने बनावट कागदपत्रांच्या मदतीने सरकारी नोकरी मिळवली होती असा आरोप पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यामधून करण्यात आला आहे.

बनावट कागदपत्रं दाखवून लाटली सरकारी नोकरी, १० वर्षांनंतर फुटलं बिंग, स्टाफ नर्सवर कारवाई
उत्तर प्रदेशमधील बलिया येथील रसडा सामुदायिक आरोग्य केंद्रात तैनात असलेल्या एका स्टाफ नर्सवर गंभीर आरोप झाले आहेत. या स्टाफ नर्सने बनावट कागदपत्रांच्या मदतीने सरकारी नोकरी मिळवली होती असा आरोप पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यामधून करण्यात आला आहे. सुमारे १० वर्षांपासून नोकरी करत असलेल्या कुमुदलता राय हिच्यावर हा आरोप झाला आहे. तसेच तिने वेगवेगळ्या परीक्षा देताना वेगवेगळी जन्मतारीख लिहून निवड प्रक्रियेत फसवणूक केल्याचा, तसेच माहिती लपवून सीएचसीमध्ये नोकरी मिळवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
सीएचसीचे अधीक्षक डॉ. मनीष जायसवाल यांनी सांगितले की, या प्रकरणी रसडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मऊ जिल्ह्यातील अमरहट गावातील रहिवासी असलेल्या कुमुदलता हिने अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या भरती परीक्षांमध्ये वेगवेगळ्या जन्मतारखेची नोंद केली होती. त्यामुळे संशय निर्माण झाला, असे या संदर्भातील तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, विभागीय कागदपत्रांची तपासणी केली असता सादर करण्यात आलेली प्रमाणपत्रे विसंगत आणि संशयास्पद असल्याचे निदर्शनास आले.
रसडा पोलीस ठाण्यातील अधिकारी योगेंद्र बहादूर सिंह यांनी सांगितले की, या नर्सविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे, तसेच त्याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, कागदपत्रांची सत्यता पडताळण्यासाठी शिक्षण बोर्ड आणि इतर संस्थांकडून माहिती मागवण्यात आली आहे.