गोव्यातील 'त्या' क्लब मालकांची अवैध मालमत्ता पाडण्याचे आदेश; कारवाई टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणला होता दबाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 17:33 IST2025-12-09T17:31:06+5:302025-12-09T17:33:39+5:30
फरार क्लब मालकांचा अवैध रोमिओ लेन बीच शॅक जमीनदोस्त करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत.

गोव्यातील 'त्या' क्लब मालकांची अवैध मालमत्ता पाडण्याचे आदेश; कारवाई टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणला होता दबाव
Goa Club Fire: गोव्यातील नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा बळी गेल्यानंतर, या घटनेला कारणीभूत ठरलेल्या फरार मालकांवर गोवा सरकारने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. सरकारने वागातोर येथील 'रोमिओ लेन' नावाचा अवैध बीच शॅक पाडण्याचे आदेश दिले असून, मुख्यमंत्र्यांनी तातडीने ही कारवाई पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. शनिवारी मध्यरात्री अरपोरा येथील बर्च बाय रोमिओ लेन या नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीनंतर मोठी दुर्घटना घडली. या क्लबचे मालक असलेले सौरभ आणि गौरव लुथरा घटनेनंतर काही तासांतच थायलंडला पळून गेले आहेत. या बंधूंची वागातोर येथील रोमिओ लेन नावाची मालमत्ता सरकारी जागेवर अवैधपणे उभी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जिल्हा प्रशासनाला तातडीने कायदेशीर औपचारिकता पूर्ण करून मंगळवारीच ही पाडकाम कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वीच तपास पथकांनी वागातोर शॅक आणि असागाव येथील आणखी एक मालमत्ता सील केली होती. आता रोमिओ लेन हा त्यांचा तिसरा अवैध धंदा पाडण्यात येणार आहे. या दुर्घटनेनंतर केवळ क्लब मालकांचे बेजबाबदार वर्तनच नव्हे, तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कथित हस्तक्षेपाचा धक्कादायक खुलासा झाला आहे. तपास करणाऱ्या एका वरिष्ठ स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जर योग्य वेळी कारवाई झाली असती तर हे मृत्यू टाळता आले असते.
नोटीस देऊनही दुर्लक्ष
अंजुना पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रँचने क्लब मालकांना आधीच कागदपत्रे आणि परवानग्या सादर करण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या. पण वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी कथितपणे हस्तक्षेप करून पुढील कारवाई रोखली. इतकेच नाही, तर मोठ्या आवाजात संगीत वाजवल्याबद्दल क्लबवर दाखल झालेली एफआयआर रद्द करण्यासाठीही स्थानिक पोलिसांवर दबाव आणला गेला होता.
तपास थांबवण्याचे आदेश
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान अंजुना पोलीस निरीक्षक प्रशांत देसाई यांनी क्लबच्या परवानग्यांची माहिती मागवली होती, पण एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने (जे आता निवृत्त झाले आहेत) चौकशी थांबवली. नंतर क्राईम ब्रँचचे डीएसपी राजेश कुमार आणि अंजुना पीआय परेश नाईक यांचे कारवाईचे प्रयत्नही थांबवण्यात आले आणि त्यांना क्लब मालकांना न दुखावता क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यास सांगण्यात आले. पोलिसांचे तपास पथक आता या क्लब मालकांशी संबंध असलेल्या आणि निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांच्या कॉल रेकॉर्डची तपासणी करत आहेत.
तीन सरकारी अधिकारी निलंबित
या भीषण दुर्घटनेनंतर राज्याचे महसूल मंत्री अटानासियो बाबुश मोन्सेरेट यांनी तातडीने आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. या दुर्घटनेच्या संदर्भात आतापर्यंत तीन सरकारी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. राज्य सरकारने नाईट क्लबची इमारत पाडणे हे पुढील धोका टाळण्यासाठी आणि सुरू असलेल्या तपासात मदत करण्यासाठी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.