गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 22:33 IST2025-12-07T22:32:16+5:302025-12-07T22:33:08+5:30
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. क्लब मालग सौरभ लूथरा आणि मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या दुर्घनेसंदर्भात दुःख व्यक्त केले आहे.

गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
गोव्यातील पणजी येथील 'बर्च बाय रोमियो लेन' नाईट क्लबमधील भीषण अग्निकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. या भीषण दुर्घटनेत 25 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये 4 पर्यटक आणि 14 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर 7 जणांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. याशिवाय 6 जखमींवर रुग्णालयात उपचार सूरू आहेत.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. क्लब मालग सौरभ लूथरा आणि मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या दुर्घनेसंदर्भात दुःख व्यक्त केले आहे.
महत्वाचे म्हणजे, या नाइट क्लबमधून बाहेर पडण्यासाठी केवळ दोनच गेट होते. यामुळे लोकांमध्ये गोंधळ उडाला आणि यामुळे 25 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय, ही आग तेथील फर्नीचरमुळे अधिकच वेगाने पसरली. विशेष म्हणजे, लोकांना काही समजण्याच्या आतच ही आग संपूर्ण क्लबमध्ये पसली.
काय म्हणाले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत? -
या दुर्घटनेसंदर्भात बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले की, नाइटक्लबमध्ये लागलेली भीषण आग सिलिंडर स्फोटमुळे नाही, तर क्लबमध्ये उडवल्या जाणाऱ्या इंटर्नल फायरवर्क्समुळे भडकली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी दंडाधिकारी चौकशी (मजिस्ट्रियल इनक्वायरी) आणि एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. तपासातील प्राथमिक संकेतांनुसार, फटाक्यांमुळे आग लागल्याचे आणि क्लबमधील अनेकांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे.
चार व्यवस्थापकांना अटक -
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लबचे मुख्य महाव्यवस्थापक राजीव मोदक, महाव्यवस्थापक विवेक सिंह, बार व्यवस्थापक राजीव सिंघानिया आणि गेट व्यवस्थापक रियांशु ठाकुर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्वांविरोधात निष्काळजीपणा आणि नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. क्लबचे मालक सौरभ लूथरा आणि गौरव लूथरा यांच्याविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
सावंत यांनी पोलीस महासंचालक आलोक कुमार यांना या प्रकरणात कोणतीही हयगय न करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच, ज्या सरकारी अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन होऊनही क्लबला काम करण्याची परवानगी दिली, त्यांनाही त्वरित निलंबित करण्याची कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
विशेष समिती स्थापन -
राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कँडावेलू आणि डीजीपी यांना दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या भीषण दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी राज्य सरकारने विशेष समिती स्थापन केली आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, अग्निशमन सेवा उपसंचालक आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे संचालक यांचा या समितीत समावेश आहे. ही समिती एका आठवड्यात आपला अहवाल सादर करेल.
मुख्यमंत्री सावंत यांनी पीडितांना मदत जाहीर केली असून, प्रत्येक मृताच्या जवळच्या नातेवाईकांना ₹5 लाख आणि जखमींना ₹50 हजार रुपयांची मदत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निधीतून दिली जाईल.