Goa Night Club Fire: म्युझिक, डान्स फ्लोअरवर १०० जण आणि...आग लागली तेव्हा काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने दिली धक्कादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 12:22 IST2025-12-07T12:22:20+5:302025-12-07T12:22:33+5:30
Goa Night Club Fire: गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये काल रात्री आग लागून भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत सुमारे २५ जणांचा मृत्यू झाला आहे. गोव्यातील या नाईट क्लबमध्ये नेमकी कशी आग लागली याचा तपास सुरू आहे. दरम्यान, या नाईट क्लबमध्ये आग लागली तेव्हा तिथे उपस्थित असलेल्यांपैकी काही प्रत्यक्षदर्शींनी धक्कादायक माहिती दिली आहे.

Goa Night Club Fire: म्युझिक, डान्स फ्लोअरवर १०० जण आणि...आग लागली तेव्हा काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने दिली धक्कादायक माहिती
गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये काल रात्री आग लागून भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत सुमारे २५ जणांचा मृत्यू झाला आहे. गोव्यातील या नाईट क्लबमध्ये नेमकी कशी आग लागली याचा तपास सुरू आहे. दरम्यान, या नाईट क्लबमध्ये आग लागली तेव्हा तिथे उपस्थित असलेल्यांपैकी काही प्रत्यक्षदर्शींनी धक्कादायक माहिती दिली आहे. उत्तर गोव्यातील अरपोरा गावात असलेल्या या नाईट क्लबमध्ये जेव्हा आग लागली तेव्हा तिथे सुमारे १०० जण डान्स फ्लोअरवर होतो. तसेच जेव्हा स्फोट झाला तेव्हा जीव वाचवण्यासाठी काही जण खाली किचनच्या दिशेने पळाले, तिथे ते कर्मचाऱ्यांसोबत अडकले, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली.
तर गोवा पोलिसांनी सांगितले की, पणजीपासून २५ किमी अंतरावर असलेल्या अरपोरा गावामध्ये असलेल्या बिर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत सुमारे २५ जणांचा मृत्यू झाला आहे. गोव्यातील या नाईट क्लबमध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली, अशी माहितीही पोलिसांनी दिली. तर काही प्रत्यक्षदर्शींनी मात्र ही आग पहिल्या फ्लोअरवर लागली. तसेच तिथे काही पर्यटक डान्स करत होते, असे सांगितले.
दरम्यान, हे अग्निकांड घडले तेव्हा तिथे असलेल्या हैदराबादमधील एक पर्यटक फातिमा शेख यांनी सांगितले की, आग लालगी तेव्हा क्लबमध्ये एकच गोंधळ उडाला. आम्ही घाईघाईत क्लबमधून बाहेर पळालो. बाहेर आल्यावर पाहिलं तर साऱ्या क्लबला आगीच्या ज्वाळांनी वेढलेलं दिसलं. वीकेंड असल्याने नाईट क्लब खचाखच भरलेला होता. तसेच डान्स फ्लोअरवर सुमारे १०० लोक होते.
शेख यांनी पुढे सांगितले की, आग लागल्यानंतर काही पर्यटक खालच्या दिशेने पळाले तसेच या गडबडीत ते तळमजल्यावर असलेल्या किचनमध्ये गेले. तसेच तिथे हे पर्यटक इतर कर्मचाऱ्यांसोबत अडकले. मात्र अनेक जण क्लबमधून बाहेर पडण्यात यशस्वी ठरले. त्यानंतर संपूर्ण क्लब आगीने वेढला गेला.
आगीबाबत माहिती देताना अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या क्लबकडे जाणारी वाट अरुंद असल्याने अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळापासून ४०० मीटर दूर उभे करावे लागले. दरम्यान, मृत्यू झालेल्यांपैकी अनेक जण हे तळघरात अडकलेले असल्याने त्यांचा मृत्यू हा श्वास गुदमरल्याने झाला. तर मृत्युमुखी पडलेल्या २५ जणांपैकी २ जणांचा मृत्यू हा आगीत जळून झाला, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.