बहिणीच्या प्रियकराला धडा शिकवण्यासाठी 'तो' बनला 'ती'; लाँग ड्राईव्हवर असताना भलताच प्रकार घडला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 03:45 PM2021-06-23T15:45:39+5:302021-06-23T15:46:07+5:30

फोनवर मुलीच्या आवाजात बोलून त्यानं बहिणीच्या प्रियकराला भेटायला बोलावलं. त्यानंतर दोघंही लाँग ड्राइव्हवर गेले आणि पुढे जे काही घडलं ते चक्रावून सोडणारं ठरलं.

Girl Made To Teach A Lesson To Sister Lover Drank Alcohol Went Long Drive Then Caught By Bhilwara Police | बहिणीच्या प्रियकराला धडा शिकवण्यासाठी 'तो' बनला 'ती'; लाँग ड्राईव्हवर असताना भलताच प्रकार घडला अन्...

बहिणीच्या प्रियकराला धडा शिकवण्यासाठी 'तो' बनला 'ती'; लाँग ड्राईव्हवर असताना भलताच प्रकार घडला अन्...

Next

राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यात एक अनोखा प्रकार उघडकीस आला आहे. एका भावानं त्याच्या बहिणीच्या प्रियकराला धडा शिकवण्यासाठी वेशांतर करुन महिलेचं रुप धारण केलं. त्यानंतर फोनवर मुलीच्या आवाजात बोलून त्यानं बहिणीच्या प्रियकराला भेटायला बोलावलं. त्यानंतर दोघंही लाँग ड्राइव्हवर गेले. पण मद्यपान करुन दोघंही मद्यधुंद अवस्थेत रस्ताच चुकले. मग स्थानिक गावकऱ्यांनी दोघांना चोर समजून पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांच्या चौकशीत संपूर्ण गोष्ट उघडकीस आली पोलिसांनीही दोघांसमोर कोपरापासून हात जोडले. 

असा झाला प्रकरणाचा खुलासा
समोर आलेल्या माहितीनुसार भीलवाडा जिल्ह्यातील बडलियास पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सवाईपूर पोलीस चौकी क्षेत्राचा चावण्डिया गावात रात्री उशीरा पहारा देणाऱ्या गावकऱ्यांनी एका बाइकस्वाराला थांबवलं. बाइक चालवणाऱ्या तरुणाची आणि त्याच्या मागे बसलेल्या तरुणीची गावकऱ्यांनी चौकशी केली. पण समाधानकारक उत्तरं काही त्यांना मिळाली नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांना तातडीनं पोलिसांना याची माहिती दिली. मग पोलिसांनी केलेल्या चौकशीतून समोर आलं की बाइकस्वारासोबत असलेल्या व्यक्तीनं वेशांतर केलंय आणि तोही तरुणच आहे. वेशांतर केलेल्या तरुणानं बाईकस्वार तरुणाला धडा शिकवण्यासाठी वेशांतर करुन त्याला भेटायला बोलावलं होतं, असं पोलिसांना चौकशीतून लक्षात आलं. 

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाईकस्वार व्यक्तीचं नाव मिट्ठू लाल भील असं आहे. तो खेडी बेगू ठाण्याच्या हद्दीतील चित्तौडगड जिल्ह्यातील रहिवासी आहे. तर स्त्री वेशांतर केलेल्या व्यक्तीचं नाव सोनू भील असून तो सिंगोली जिल्ह्यातील रहिवासी आहे. पोलिसांनी सोनू याला वेशांतर करण्याचं कारण विचारलं असता त्यानं मिट्ठू लाल आपल्या बहिणीला सारखं फोन करुन त्रास देत होता. त्यामुळे बहिणीच्या फोनवरुन फोन करुन त्याला भेटायला बोलावलं. त्यानंतर वेशांतर करुन मी त्याला भेटायचं ठरवलं आणि लाँग ड्राइव्हवर जायचं ठरलं. 

प्रवासात मुलीच्याच आवाजात साधत होता संवाद
संपूर्ण प्रवासात मिट्ठू लालसोबत मुलीच्याच आवाजात संवाद साधत होतो, असं सोनूनं पोलिसांना सांगितलं. त्यामुळे मिट्ठूला देखील संशय आला नाही. दोघंही एका मंदिरात दर्शनाला देखील गेले होते. त्यानंतर माघारी परतात दोघांनी मद्यपान केलं. मद्यधुंद अवस्थेत दोघंही रस्ता चुकले आणि चावण्डिया गावात येऊन पोहोचले. त्याठिकाणी रात्री गस्त घालणाऱ्या गावकऱ्यांनी त्यांना अडवलं आणि चोर समजून पोलिसांच्या हवाली केलं. 

सोनू भीलचं भांड फुटलं तेव्हा पोलीसही हैराण झाले होते. त्यानं इतकं कमालीचं वेशांतर केलं होतं की कुणालाच काही संशय आला नाही. सोनूनं याआधीही काही कार्यक्रमांमध्ये वेशांतर करुन स्त्री पात्र साकारलं असल्याचंही पोलिसांना चौकशीत समोर आलं आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Girl Made To Teach A Lesson To Sister Lover Drank Alcohol Went Long Drive Then Caught By Bhilwara Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app