दिल्ली बलात्कार प्रकरणातील चार दोषींना फाशी, तिहारच्या बाहेर ‘निर्भया अमर रहे’च्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 05:45 AM2020-03-21T05:45:38+5:302020-03-21T05:46:09+5:30

फाशी टाळण्यासाठी पहाटे २.३० वाजेपर्यंत दोषींनी प्रयत्न केले. सर्वोच्च न्यायालयाने ३ वाजेच्या सुमारास अखेरचा प्रयत्नही फेटाळून लावल्यानंतर फाशीवर शिक्कामोर्तब झाले.

Four accused in Delhi rape case hanged, Nirbhaya Amar Rahe announced outside Tihar | दिल्ली बलात्कार प्रकरणातील चार दोषींना फाशी, तिहारच्या बाहेर ‘निर्भया अमर रहे’च्या घोषणा

दिल्ली बलात्कार प्रकरणातील चार दोषींना फाशी, तिहारच्या बाहेर ‘निर्भया अमर रहे’च्या घोषणा

Next

नवी दिल्ली : निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशी झाल्यानंतर दिल्लीतील तिहार कारागृहाच्या बाहेर ‘निर्भया अमर रहे’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या. पहाटे तीनपासून शेकडोंच्या संख्येने गोळा झालेले लोक फाशीनंतर जल्लोष करीत होते. एकमेकांना मिठाई वाटून त्यांनी हा क्षण अक्षरश: साजरा केला.

फाशी टाळण्यासाठी पहाटे २.३० वाजेपर्यंत दोषींनी प्रयत्न केले. सर्वोच्च न्यायालयाने ३ वाजेच्या सुमारास अखेरचा प्रयत्नही फेटाळून लावल्यानंतर फाशीवर शिक्कामोर्तब झाले. हा संपूर्ण घटनाक्रम सुरू असताना तिहारच्या बाहेरची गर्दी वाढत होती. केवळ दिल्लीतील नव्हे, तर नोएडा, फरिदाबाद, गुडगाव येथूनदेखील मोठ्या संख्येने लोक इथे दाखल झाले होते. त्यामुळे तिहार कारागृहाच्या बाहेरील गस्त आणखी वाढविण्यात आली होती. इथे आलेल्यांमध्ये सामाजिक कार्यकर्ता योगिता भयाना यांनी ‘निर्भयाला न्याय मिळाला, आता इतर मुलींना न्याय मिळण्याची प्रतीक्षा’ हे वाक्य लिहिलेले फलक उंचावले होते. अनेक लोक तिरंगा घेऊन इथे पोहोचले होते.

विशेष म्हणजे कोरोनाची दहशत दिल्लीकरांमध्ये असली तरीही आजच्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी लोक कुटुंबियांसह आले होते. दोषींचे न्यायालयात प्रयत्न सुरू असले तरीही फाशी होणार, असा ठाम विश्वास लोकांना होता. पोलिसांनी जागोजागी बॅरिकेड्स लावले होते; पण नागरिकांनी अतिशय शांततेत आपल्या भावना व्यक्त केल्यामुळे पोलिसांना कुठलीही कारवाई करण्याची किंवा ताकीद देण्याची वेळ आली नाही, हे विशेष.

मुकेशचे अवयवदान
फाशीपूर्वी शेवटची इच्छा विचारल्यावर मुकेश सिंगने अवयवदान करण्याची इच्छा व्यक्त केली, तर विनय शर्माने कारागृहातील वास्तव्यादरम्यान काढलेली चित्रे अधीक्षकांना देण्यास सांगितले. त्याने याच कालावधीत स्वत: हनुमान चालिसाही लिहून काढली होती. ती कुटुंबाला देण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.

फाशीपूर्वी नाश्ता नाही
फाशीपूर्वी चारही दोषींना नाश्त्यासाठी विचारण्यात आले होते; पण त्यांनी नकार दिला. रात्री मात्र गुरुवारी रात्री त्यांनी व्यवस्थित जेवण केले होते.

महिलांचा सन्मान आणि सुरक्षा सुनिश्चित करणे अत्यावश्यक आहे. देशातील महिला सर्वच क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करीत आहेत. महिला सबलीकरणावर भर देणारे राष्ट्र निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.
-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

तिहारमध्ये बलात्कारासाठी दुसऱ्यांदा दिली गेली फाशी
नवी दिल्ली : तिहारमध्ये बलात्कासाठी दोषींना फाशी देण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी १९८२मध्ये रंगा-बिल्ला या दोघांना फाशी देण्यात आली होती. त्यानंतर बलात्कारासाठी दोषी असलेले निर्भयाचे मारेकरी आज फासावर लटकले. एकापेक्षा अधिक दोषींना एकाचवेळी फाशी होण्याची पहिली घटना १९८२मध्ये तिहारने अनुभवली होती. त्यानंतर २०२०मध्ये निर्भया प्रकरणात हे घडले आहे. रंगा-बिल्लाच्या फाशीला चार दशके व्हायला आली तरीही त्या घटनेचे दाखले वारंवार दिले जातात. १९७८मध्ये दोघांनीही गीता आणि संजय चोप्रा या जुळ््या भावंडांचे अपहरण केले होते. मात्र, ही नौदलाच्या अधिकाºयाची मुले असल्याचे त्यांना कळल्यावर त्यांनी दोघांचाही खून केला. खून करण्यापूर्वी त्यांनी गीतावर बलात्कार केला होता. रंगा (कुलजीत सिंग) आणि बिल्ला (जसबीर सिंग) यांना न्यायालयाने फाशी सुनावली व चारच वर्षांत त्यावर अंमलबजावणीही करण्यात आली. फाशीसाठी जल्लाद फकिरा आणि जल्लाद कालू यांना फरिदकोट व मेरठच्या कारागृहातून तात्पूरते सोडले होते, असा उल्लेख तिहारचे माजी विधी अधिकारी सुनील गुप्ता यांनी ‘ब्लॅक वॉरंट’मध्ये केला आहे.

फाशीपूर्वी त्यांना चहा आणि शेवटची इच्छा विचारण्यात आली होती, मात्र दोघांनीही ती नाकारली होती. बिल्लाने फाशी शेवटच्या क्षणी ‘जो बोले सो निहाल’ असे म्हणत टाहो फोडला होता. तर रंगाला फाशी झाल्यानंतरही काही वेळ तो जीवंत होता, असाही उल्लेख पुस्तकात आहे.

‘हा तर काळा डाग’
महिलांवरील हिंसाचार संपवण्यासाठी मृत्युदंड हा कधीच उपाय नाही, असे अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियाने शुक्रवारी म्हटले. चार दोषींना दिली गेलेली फाशी ही भारताच्या मानवी हक्काच्या दप्तरात ‘काळा डाग’ असेल, असे म्हटले. २०१५ च्या आॅगस्टपासून भारतात कोणालाही फाशी दिली गेली नव्हती; परंतु दुर्दैवाने आज चौघांना फाशी दिली गेली, ते अत्याचारांना रोखण्याच्या नावाखाली. लोकप्रतिनिधी गुन्हे हाताळण्यासाठीच्या निर्धाराला देहदंडाची शिक्षा हे प्रतीक समजतात, असे अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियाचे कार्यकारी संचालक अविनाश कुमार यांनी म्हटले.

निर्भया फंडाचा पुरेसा वापरच नाही
निर्भयावरील बलात्कारानंतर महिलांच्या सुरक्षेसाठी तिच्याच नावाने केंद्र सरकारने स्थापन केलेल्या निधीचा पुरेसा वापर मात्र केला जात नाही. निर्भयावर अत्याचार झाला होता त्या दिल्लीतच या निधीचा वापर सगळ्यात कमी झाला आहे. सप्टेंबर २०१३ मध्ये तेव्हाच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने ‘निर्भया फंड’ स्थापन केला होता. या निधीचा वापर फक्त नऊ टक्के झालेला असून, काही महत्त्वाच्या शहरांत २५ टक्क्यांपेक्षाही कमी असा त्याचा वापर झालेला आहे. ओएससी योजनेत केंद्र सरकारने २०१६-२०१९ दरम्यान २१९ कोटी रुपये दिले होते. या रक्कमेपैकी ५३.९८ कोटी रुपये वापरले गेले, असे स्मृती इराणी यांनी संसदेत सांगितले होते.

Web Title: Four accused in Delhi rape case hanged, Nirbhaya Amar Rahe announced outside Tihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.