Floods wreak havoc in southern India: number of victims on hundreds | दक्षिण भारतात पुराचा कहर : बळींची संख्या शंभरावर
दक्षिण भारतात पुराचा कहर : बळींची संख्या शंभरावर

बंगळुरू/कोची : दक्षिण भारतातील पूरबळींची संख्या शंभरावर गेली आहे. रविवारपर्यंत पूरबळींची संख्या केरळमध्ये ७२ व कर्नाटकमध्ये ३१ इतकी झाली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड या आपल्या मतदारसंघाला भेट देऊन तेथील पूरग्रस्तांबरोबर संवाद साधला. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटकातील पूरस्थितीची हवाई पाहाणी केली.
आठवडाभराच्या मुसळधार पावसामुळे केरळमध्ये पूर आला आहे. वायनाड, कन्नूर, कासारगोड जिल्ह्यांमध्ये आता पावसाने जरा उसंत घेतली असली तरी तिथे दिलेला रेड अलर्टचा इशारा अद्यापही कायम आहे. केरळमध्ये गेल्या वर्षीही महापूर येऊन त्या राज्याचे प्रचंड नुकसान झाले होते. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितले की, केरळमधील अडीच लाख पूरग्रस्तांनी १५५० निवारा शिबिरांमध्ये आश्रय घेतला आहे. राजकीय मतभेद विसरून नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मुसळधार पावसामुळे धावपट्टी पाण्याखाली गेल्याने बंद केलेला कोचीचा विमानतळ रविवार दुपारपासून हवाई वाहतुकीसाठी पुन्हा खुला झाला. अबुधाबीहून आलेले विमान तेथे उतरले. (वृत्तसंस्था)

राहुल गांधींनी जाणून घेतल्या व्यथा


अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यासाठी वायनाडमधील बनसौरसागर धरणाचे दरवाजे शनिवारी उघडण्यात आले आहेत. राहुल गांधी यांनी वायनाडमध्ये दाखल झाल्यानंतर तेथील निवारा शिबिरांना भेटी दिल्या.
वायनाड, मलप्पुरम जिल्ह्यांमध्येही पूरामध्ये काही जणांचे बळी गेले आहेत. वायनाडमधील पूरग्रस्तांच्या व्यथा राहुल गांधी यांनी जाणून घेतल्या. आणखी काही दिवस आपला मुक्काम वायनाडमध्येच असल्याचे राहुल गांधी यांनी एका टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे.

हंपीला पुराचा धोका : अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यासाठी तुंगभद्रा धरणाचे दरवाजे रविवारी सकाळी उघडण्यात आले असून त्यामुळे ऐतिहासिक महत्त्वाच्या हंपी शहरालाही पुराचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. धरणातून सोडलेले पाणी हंपी शहरात काही ठिकाणी शिरले आहे. तेथील पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

कर्नाटकात 17 जिल्ह्यांना तडाखा 
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून रविवारी बेळगाव जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आदी नेतेमंडळी होती.
कर्नाटकातील १७ जिल्ह्यांतल्या ८० तालुक्यांना पुरासा तडाखा बसला असून ४ लाख लोकांना आपले घरदार सोडून दुसरीकडे स्थलांतरित व्हावे लागले आहे.

कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड, उडुपी, उत्तर कन्नड, शिवमोगा, चिकमंगळुरू, कोडगू, हसन या जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीमुळे देण्यात आलेला रेड अलर्टचा इशारा उद्या, सोमवार सकाळपर्यंत कायम ठेवण्यात येणार आहे.
सकलेशपूर व सुब्रमण्य दरम्यानची रेल्वेसेवा दरड कोसळल्यामुळे विस्कळीत झाली आहे. बेळगावमध्येही मोठा पूर आला असून त्यात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी लष्कर, नौदल, एनडीआरएफच्या जवानांनी मदतकार्य हाती घेतले होते.


Web Title:  Floods wreak havoc in southern India: number of victims on hundreds
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.