flood situations made lives in trouble in himachal and uttrakhand many people died | हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये 'जलप्रलय'; 31 जणांचा मृत्यू 
हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये 'जलप्रलय'; 31 जणांचा मृत्यू 

ठळक मुद्देभारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.अनेक भागात दरड कोसळली असून ढगफुटी झाली आहे.

नवी दिल्ली - भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागात दरड कोसळली असून ढगफुटी झाली आहे. पावसामुळे आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती असून गावांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी भूस्खलनही झाले आहे. 

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुराचे थैमान पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले असून रस्ते वाहून गेले आहेत. सार्वजनिक मालमत्ता आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लाहौल स्पितीपासून कुल्लूपर्यंत सर्व भाग पुराच्या पाण्याखाली गेला आहे. कुल्लू जिल्ह्यात रोहरू येथे भूस्खलनात एकाचा मृत्यू झाला आहे. एक झाड कोसळून दोघांचा तर चंबा येथे पूराच्या पाण्यात वाहून गेल्याने एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

मनाली आणि कुल्लूदरम्यान असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या काही भागाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. शिमल्यात आरटीओ कार्यालयाजवळ भूस्खलन होऊन तीन जणांचा मृत्यू झाला आहे. वातावरणत बदल होत असल्याने हवामान खात्याने हिमाचल, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. जोरदार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

राज्यांतील पाणी आता दिल्लीलाही वेढण्याची शक्यता असून यमुना नदीतून गेल्या 40 वर्षांतील सर्वाधिक पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे देशाची राजधानी पुराच्या पाण्यात जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 15 दिवसांपासून महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या राज्यांना पुराचा फटका सहन करावा लागला आहे. यातच केरळ, आसाममध्येही महापुराची स्थिती आहे. येथील पूर ओसरतो न ओसरतो तोच उत्तरेकडील राज्यांमध्ये मुसळधार अतिवृष्टी होत आहे. यमुना नदीची पातळी वाढल्याने हरियाणाच्या हथिनीकुंड डॅममधून रविवारी तब्बल 8.72 लाख क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी सोमवारी सायंकाळपर्यंत दिल्लीला पोहोचण्याची शक्यता आहे. याआधी 1978 मध्ये पुरामुळे हरियाणातून 7 लाख क्यूसेक पाणी सोडण्यात आले होते. 

मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्यामुळे यमुना नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची स्थिती असून दिल्ली सरकारने आपत्कालीन बैठक बोलावली आहे. तसेच खालील भागातील लोकांना हलविण्यात आले आहे. यामध्ये सोनिया विहार, गीता कॉलनी, मयूर विहार, डीएनडी, यमुना बाजार, काश्मीरी गेट, वजीराबाद, लोहे का पूल, आयटीओ ओखला, जामिया आणि जैतपूर हे भाग सहभागी आहेत. येथील लोकांना सुरक्षित स्थळी तंबूंमध्ये आसरा देण्यात आला आहे. सध्या 1100 तंबू लावण्यात आले असून जवळपास 5 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. 

 


Web Title: flood situations made lives in trouble in himachal and uttrakhand many people died
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.