विमान उड्डाणे रद्द! Indigo नं सरकारला दिलं उत्तर; प्रमुख ५ कारणांचा खुलासा, का आली ही वेळ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 08:03 IST2025-12-09T08:03:14+5:302025-12-09T08:03:14+5:30
या सर्व घटकांमुळे वैमानिकांच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द झाली हे कंपनीने मान्य केले.

विमान उड्डाणे रद्द! Indigo नं सरकारला दिलं उत्तर; प्रमुख ५ कारणांचा खुलासा, का आली ही वेळ?
नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी एअरलाइन्स कंपनी इंडिगोने मागील ७ दिवसांपासून सुरू असलेल्या संकटावर एक सविस्तर रिपोर्ट सरकारला सादर केला. ३ डिसेंबरपासून सुरू झालेल्या सावळागोंधळामुळे आतापर्यंत ३९०० हून अधिक उड्डाणे रद्द झाली आहेत. ज्यामुळे देशभरात विमान वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला. इंडिगोने त्यांच्या उत्तरात या परिस्थितीवर खेद व्यक्त करत प्रवाशांची माफी मागितली आहे. इंडिगोने त्यांचा खुलासा एका पत्राद्वारे सरकारकडे केला आहे. हे पत्र गोपनीय ठेवले आहे.
इंडिगोने पत्रात म्हटलंय की, हे संकट कुठल्या एका कारणामुळे ओढावले नाही तर त्यामागे अनेक कारणे आहेत आणि अचानक परिस्थिती बिघडली. आमची ऑपरेशनल स्केल खूप मोठी आहे त्यामुळे कोणत्याही एका कारणाला दोष देणे शक्य नाही असं सांगितले. इंडिगोने डीजीसीएला शॉ कॉज नोटीसला उत्तर देण्यासाठी आणखी काही काळ वेळ मागितला आहे. कारण नियमाप्रमाणे १५ दिवसांचा कालावधी दिला जाऊ शकतो. एअरलाइनने त्यांच्या सुरुवातीच्या तपासात काही कारणे पुढे आल्याचे म्हटलं. त्यात विंटर शेड्युल्ड लागू झाल्यानंतर काही बदल, तांत्रिक बिघाड, खराब वातावरण, एअरस्पेसमध्ये गर्दी आणि एफडीटीएल फेज टू अंतर्गत नव्या पायलट ड्युटी नियमांचा समावेश आहे. इंडिगोने याआधीही डीजीसीएच्या नवीन नियमांवर चिंता व्यक्त केली आणि काही काळात त्यातून सूट द्यावी अशी मागणी केली होती.
या सर्व घटकांमुळे वैमानिकांच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द झाली हे कंपनीने मान्य केले. परिणामी त्यांची वेळेवर कामगिरी घसरली. सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. जी क्रू व्यवस्थापन, कर्मचारी नियोजन आणि FDTL नियमांचे पालन तपासेल. इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स आणि इतर वरिष्ठ अधिकारी समितीसमोर हजर राहतील. आम्ही प्रवाशांना वेगाने पूर्ण परतफेड करत आहोत. आतापर्यंत ₹६१० कोटींपेक्षा जास्त किमतीचे परतफेड प्रक्रिया करण्यात आली आहे असं इंडिगोने सांगितले.
दरम्यान, ३ ते १५ डिसेंबर या कालावधीत रद्द झालेल्या सर्व विमानांचे तिकिटांचे पैसे रिफंड करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची घोषणा कंपनीने सोमवारी केली. या मोठ्या गोंधळामुळे आणि हजारो प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल इंडिगोने दिलगिरी व्यक्त केली आहे. या काळात तिकीट बदलण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी आता प्रवाशांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. इंडिगोने परताव्याची तारीख ४८ तास मागे घेतली आहे. पूर्वी ही घोषणा ५ डिसेंबरपासूनच्या तिकिटांसाठी होती, ती आता ३ डिसेंबरपासून रद्द झालेल्या विमानांना लागू करण्यात आली आहे.