मुलाला छातीशी कवटाळून वडील रुग्णालयांत सात तास भटकले, उपचाराविना बाळाने प्राण सोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 04:28 PM2020-05-28T16:28:26+5:302020-05-28T16:28:58+5:30

नुकत्याच जन्मलेल्या एका मुलाचे वडील त्याला छातीशी कवटाळून उपचारांसाठी रुग्णालयात भटकत राहिले. मात्र कुठेच उपचार होऊ न शकल्याने या मुलाने वडलांच्या कुशीतच प्राण सोडल्याचे समोर आले आहे.

Father hugs child & wanders in hospital for seven hours, baby dies without treatment BKP | मुलाला छातीशी कवटाळून वडील रुग्णालयांत सात तास भटकले, उपचाराविना बाळाने प्राण सोडले

मुलाला छातीशी कवटाळून वडील रुग्णालयांत सात तास भटकले, उपचाराविना बाळाने प्राण सोडले

Next

ग्रेटर नोएडा - कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या देशात गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली असून, त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामधून समोर आला आहे. येथे एका मुलाचे वडील त्याला छातीशी कवटाळून उपचारांसाठी रुग्णालयात भटकत राहिले. मात्र कुठेच उपचार होऊ न शकल्याने या मुलाने वडलांच्या कुशीतच प्राण सोडल्याचे समोर आले आहे.

मुलाच्या मृत्यूमुळे व्यथित झालेल्या या वडिलांनी आपले दु:ख सोशल मीडियावर मांडून न्यायाची मागणी केली आहे. दरम्यान, हे प्रकरण तापू लागल्यानंतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी एक द्विसदस्यीस समितीही नियुक्त करण्यात आली आहे.

याबाबतची सविस्तर हकिकत अशी की, ग्रेटर नोएडातील सेक्टर ३६ मध्ये राहणारे राजकुमार यांच्या मुलाचा उपचारांअभावी मृत्यू झाला. मात्र रुग्णालयात सगळीकडे धावाधाव करूनही ते आपल्या मुलाचे प्राण वाचवू शकले नाहीत. राजकुमार यांनी सांगितले की, ते एका खासगी कंपनीत काम करतात. येथील एका रुग्णालयात त्यांच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला. दरम्यान, रात्री १० च्या सुमारास त्यांच्या नवजात मुलाची तब्येत बिघडली. मात्र रुग्णालयात व्हेंटिलेटरची सुविधा नसल्याचे सांगत रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या मुलाला डिश्चार्ज दिला.

 त्यानंतर राजकुमार दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात गेले. मात्र तिथे मोठा खर्च सांगण्यात आल्याने त्यांनी आपल्या मुलाला घेऊन सरकारी रुग्णालयात धाव घेतली. मात्र तिथे मुलांचे डॉक्टर उपलब्ध नव्हते. तसेच रुग्णालयात होते ते डॉक्टर झोपलेले होते. अशाप्रकारे संपूर्ण रात्र या मुलाला  उपचारांविना काढावी लागली. अखेरीस पहाटे पाच वाजता एका अॅम्ब्युलन्सने या मुलाला नोएडाच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तत्पूर्वीच या मुलाची प्राणज्योत मालवली होती.

  दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गौतम बुद्धनगरचे सीएमओ डॉक्टर दीपक ओहरी यांनी या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले आहेत. त्यासाठी एक द्विसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली असून, पोलिसांच्या पथकांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचा जबाब नोंदवला आहे.

Web Title: Father hugs child & wanders in hospital for seven hours, baby dies without treatment BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.