सरकारच्या पत्रावर शेतकरी आज घेणार निर्णय; संयुक्त किसान मोर्चाची बैठक, पुढील रणनीती ठरविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 02:04 AM2020-12-23T02:04:19+5:302020-12-23T07:16:38+5:30

Farmer Protests : कृषी मंत्रालयाने पत्र पाठविल्यानंतर मंगळवारी पंजाबच्या ३२ शेतकरी संघटनांनी सिंघू सीमेवर बैठक घेतली. बुधवारी ५०० संघटनांचे नेतृत्व करणारी संयुक्त किसान मोर्चा बैठक घेत असून, या बैठकीत शेतकऱ्यांची पुढील रणनिती ठरणार आहे.

Farmers to take decision today on government letter; The meeting of Samyukta Kisan Morcha will decide the next strategy | सरकारच्या पत्रावर शेतकरी आज घेणार निर्णय; संयुक्त किसान मोर्चाची बैठक, पुढील रणनीती ठरविणार

सरकारच्या पत्रावर शेतकरी आज घेणार निर्णय; संयुक्त किसान मोर्चाची बैठक, पुढील रणनीती ठरविणार

Next

-   विकास झाडे

नवी दिल्ली : सरकारने शेतकरी संघटनांना पाठविलेल्या पत्रावर संयुक्त किसान मोर्चा बुधवारी सकाळी बैठक घेत असून प्रत्युत्तर लेखी देण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. दरम्यान आज आंदोलनाच्या २७ व्या दिवशीही शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी रस्ते जाम केलेत. एका तरुण शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे.
कृषी मंत्रालयाने पत्र पाठविल्यानंतर मंगळवारी पंजाबच्या ३२ शेतकरी संघटनांनी सिंघू सीमेवर बैठक घेतली. बुधवारी ५०० संघटनांचे नेतृत्व करणारी संयुक्त किसान मोर्चा बैठक घेत असून, या बैठकीत शेतकऱ्यांची पुढील रणनिती ठरणार आहे. सुत्राने दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांकडून लेखी उत्तर पाठविले जाणार आहे. 
उद्याच्या बैठकीत तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत आणि ‘एमएसपी’वर कायदा करावा हे निर्णय होेण्याची शक्यता आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांचे आंदोलन ऐन कडाक्याच्या थंडीत दीर्घकाळ चालू शकते. सरकारप्रमाणे आपणही एक पाऊल मागे घ्यावे आणि तोडगा काढावा असेही काही शेतकरी नेते मत मांडू शकतात. दरम्यान, सरकारने आणलेले कायदे चांगले असल्यामुळे विरोध करू नका, असेही काही संघटना सांगत आहेत.

कायद्याला समर्थन
गौतमबुद्ध नगर येथे कायद्याच्या समर्थनार्थ ट्रक्टर रॅली काढण्यात आली. या कायद्याला आमचे समर्थन आहे. विरोध करणाऱ्यांनी या कायद्याचा सुक्ष्म अभ्यास करावा असे रॅलीत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी सांगितले.

पगडी आणि खट्टर
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्ट यांना अंबाला येथे शेतकºयांच्या रोष सहन करावा लागला. मुख्यमंत्री येणार म्हणून शेतकरी काळे झेंडे दाखवत शांततेत निदर्शने करीत होते. पोलिसांनी त्यांना शेतकाऱ्यांवर धक्काबुक्की केली. त्यात एका शेतकºयाची पगडी जमिनीवर पडली. पगडी पडल्यानंतर शेतकºयांचा राग अनावर झाला. त्यांनी अ‍ॅम्बुलन्स वगळता मुख्यमंत्र्याच्या काफील्यातील प्रत्येक गाडीवर लाठ्या हाणल्यात. त्यात खट्टर यांची गाडीही सुटू शकली नाही.

कॅनडाचा गायक सीमेवर
भारतीय मूळ असलेले कॅनडाचे गायक जैजी हे सिंघू सीमेवर पोहचले. त्यांनी आंदोलनाला समर्थन देत मार्गदर्शन केले.

उपोषणात मंत्रीही...
शेतकºयांनी सोमवारपासून २४ तासांचे श्रृंखला उपोषण सुरू केले आहे. पंजाबचे मंत्री विजय इंदर सिंगला यांनी उपोषणाला समर्थन दिले आहे. त्यांनी ट्वीट करीत एक दिवस शेतकऱ्यांसोबत उपोषणावर बसणार असल्याचे सांगितले.

राहुल गांधी उद्या राष्ट्रपतींना भेटणार
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. तीन कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीचे २ कोटी सह्यांचे निवेदन यावेळी ते राष्ट्रपतींना देणार आहेत. 

भ्रम निर्माण करीत आहे सरकार
सरकारने शेतकरी नेत्यांना पत्र पाठविल्यानंतर किसान मजदूर संघर्ष समितीचे नेता श्रवण सिंह पंढेर यांनी सरकारची ही खेळी आहे. सामान्य नागरीकांच्या मनात शेतकऱ्यांबाबत रोष निर्माण करून शेतकऱ्यांची फसगत करण्याचा त्यांचा डाव आहे. आम्हाला कायद्यात संशोधन नकोच आहे, हे तिन्ही कायदे मागे घ्यावे लागतील, तेव्हाच आम्ही माघारी फिरू असे सांगितले.

एका शेतकऱ्याचा मृत्यू
दिल्ली-हरियाणावरील टीकरी सीमेवर आंदोलनात सहभागी झालेला ३१ वर्षीय हरमिंदर सिंह या शेतकऱ्याचा आंदोलनातून पंजाबला परतत असताना अपघाती मृत्यू झाला. हा तरुण जांगपूर, लुधियाना येथील निवासी आहे. शेतकरी आंदोलनातील संबंधित हा ३४ वा मृत्यू आहे.

समंजस शेतकरी
गाझियाबाद - दिल्ली मार्ग अडविल्यानंतर सामान्य नागरीकांना अडचण निर्माण झाली. स्थानिक अधिकाऱ्यांनी विनंती केल्यानंतर शेतकऱ्यांनी हा रस्ता रहदारीस मोकळा करुन देत आपल्यातील समंजसपणाचा परिचय करुन दिला.

पुन्हा जाम
दररोज शेतकरी कुठले ना कुठले रस्ते जाम करीत आहे. मंगळवारी चिल्ला सीमा बंद केल्याने नोएडा-गाझियाबाद रस्ता बंद झाला. महामाया उडाणपुलावर पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवले त्यामुळे इथेही जाम लागला. शेतकऱ्यांनी धरणे दिले. राज्यसभा खासदार सुरेंद्र नागर यांनी शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. दिल्ली-मेरठ रस्ता बंद करण्यात आला. भोपरा, ज्ञानी, महाराजपूर सीमा, कोशांबी, वैशाली आणि लिंक रोडवर जाम लागला आहे.

 

Web Title: Farmers to take decision today on government letter; The meeting of Samyukta Kisan Morcha will decide the next strategy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.