फडणवीसांचा अहवाल 'भिजलेला लवंगी फटाका', संजय राऊतांनी उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 11:35 AM2021-03-24T11:35:11+5:302021-03-24T11:35:35+5:30

फडणवीस यांनी दिलेल्या अहवालात सरकारबद्दल काहीही चुकीचं नाही, आपण तो अहवाल वाचावा. जुन्या सरकारवर निष्ठा असलेल्या अधिकाऱ्यांनी काही कागद बनवले असतील, चांगल्या हेतूने.

Fadnavis's report which gave home secreatery is Soaked clove cracker, ridiculed by Sanjay Raut | फडणवीसांचा अहवाल 'भिजलेला लवंगी फटाका', संजय राऊतांनी उडवली खिल्ली

फडणवीसांचा अहवाल 'भिजलेला लवंगी फटाका', संजय राऊतांनी उडवली खिल्ली

googlenewsNext
ठळक मुद्देपश्चिम बंगालमध्ये सध्या जसं खेला होबे सुरूय, तसंच महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये खेला होबे सुरू आहे. त्यामध्ये, महाराष्ट्राच्या जनतेचं चांगलं मनोरंजन सुरू आहे, त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला टॅक्सही द्यायची गरज नसून हे टॅक्स फ्री आहे, असेही राऊत यांनी म्हटलं.

नवी दिल्ली - पोलीस दलातील बदल्या आणि पदोन्नतीसंदर्भातील रॅकेटचा २५ ऑगस्ट २०२० रोजीच अहवाल दिलेला असताना दोषींवर कारवाई न करता हा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांनाच बाजूला करण्यात आले, असा आरोप करत यासंबंधीचा तत्कालीन गुप्तवार्ता प्रमुख, पोलीस महासंचालक आणि गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यातील कथित पत्रव्यवहार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघड केला. याबाबतचे पुरावेही त्यांनी दिल्लीत जाऊन गृहसचिवांना दिले आहेत. मात्र, फडणवीसांच्या पुराव्यात काडीचाही दम नाही, अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलीय. 

फडणवीस यांनी दिलेल्या अहवालात सरकारबद्दल काहीही चुकीचं नाही, आपण तो अहवाल वाचावा. जुन्या सरकारवर निष्ठा असलेल्या अधिकाऱ्यांनी काही कागद बनवले असतील, चांगल्या हेतूने. या कागदाची काय दखल घ्यायची ते मुख्यमंत्री ठरवतील. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जे काही कागदपत्रे दिली त्यात काडीचाही दम नाही. विरोधी पक्षनेते म्हणे काही बॉम्ब वगैरे घेऊन आले होते. पण, तो बॉम्ब नसून भिजलेला लवंगी फटका आहे. या फटाक्याला वातसुद्ध नव्हती, आम्हीच दिल्लीत कुठं स्फोट झाला का, हे शोधत होतो, असे म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्लाय अहवालाची खिल्ली उडवली.  

पश्चिम बंगालमध्ये सध्या जसं खेला होबे सुरूय, तसंच महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये खेला होबे सुरू आहे. त्यामध्ये, महाराष्ट्राच्या जनतेचं चांगलं मनोरंजन सुरू आहे, त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला टॅक्सही द्यायची गरज नसून हे टॅक्स फ्री आहे, असेही राऊत यांनी म्हटलं. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. ते महाराष्ट्रात निवडून आले आहेत, त्यामुळे त्यांनी जे काही दाखवायचं होतं, चर्चा करायची होती ती येथेच करायला हवी होती. घरातला वाद घरात. पण, त्यांच्याकडील पुराव्यात काहीच दम नाही, म्हणूनच ते दिल्लीला गेले, असेही राऊत यांनी म्हटले.   

देवेंद्र फडणवीसांनी सादर केला अहवाल

या अहवालाच्या पुष्ट्यर्थ ६.३ जीबी डेटा फडणवीस यांनी मंगळवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांच्याकडे सादर केला आणि याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. या डेटामध्ये अनेक पोलीस अधिकारी, राजकीय नेते यांची नावे असल्याचा दावा करत यातील केवळ पत्रव्यवहार  उघड करीत असून अधिक तपशील उघड करणार नाही, असे फडणवीस यांनी मुंबईत  सांगितले. पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटप्रकरणी गुप्तवार्ता आयुक्तांनी एक अहवाल तयार केला होता. असे करण्यापूर्वी त्यांनी एसीएस-गृह यांची रीतसर परवानगीही घेतली होती. हा अहवाल तत्कालीन पोलीस महासंचालकांनी गृह विभागाकडे सादर केला. या अहवालात सीआयडी चौकशीची शिफारस केली होती. पण, तसे न करता रश्मी शुक्ला यांचीच उचलबांगडी झाली. या अहवालात ज्या नियुक्त्या व पदोन्नतींसाठी देवाणघेवाणीचा उल्लेख आहे, तीच  यादी प्रत्यक्षात निघाली. त्यासाठी  तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्यावर सुद्धा दबाव होता. पण, त्यांनी तो झुगारला, असे फडणवीस म्हणाले.

सीलबंद पुरावे  

महाराष्ट्र पोलीस दलातील बदल्या आणि पदोन्नतीच्या रॅकेटसंदर्भातील संपूर्ण माहिती, पुरावे सीलबंद लिफाफ्यात आपण केंद्रीय गृहसचिवांना दिले. ही संपूर्ण माहिती आणि पुरावे पडताळून सुयोग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय गृहसचिवांनी दिल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 
 

Web Title: Fadnavis's report which gave home secreatery is Soaked clove cracker, ridiculed by Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.