फडणवीस, खट्टर, दास हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे चेहरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 05:05 AM2019-08-19T05:05:59+5:302019-08-19T05:10:01+5:30

पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी जिंद येथील एका सभेत हरियाणात पुन्हा मनोहर लाल खट्टर सरकार आणण्यासाठी पक्षाला ९० पैकी ७५ जागी विजयी करण्याचे मतदारांना आवाहन करून याचे सूतोवाच केले होते.

Fadnavis, Khattar and Das are the faces of the Chief Minister again | फडणवीस, खट्टर, दास हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे चेहरे

फडणवीस, खट्टर, दास हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे चेहरे

Next

नवी दिल्ली : येत्या काही महिन्यांत होणाऱ्या महाराष्ट्र, हरियाणा व झारखंड विधानसभा निवडणुकांमध्ये या राज्यांमधील गेल्या पाच वर्षांतील सुशासन हाच भाजपचा प्रचाराचा मुख्य मुद्दा असेल व अनुक्रमे देवेंद्र फडणवीस, मनोहर लाल खट्टर अणि रघुबीर दास हे विद्यमान मुख्यमंत्रीच पक्षातर्फे नेतृत्वाचे चेहरे म्हणून मतदारांपुढे आणले जातील, असे पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी जिंद येथील एका सभेत हरियाणात पुन्हा मनोहर लाल खट्टर सरकार आणण्यासाठी पक्षाला ९० पैकी ७५ जागी विजयी करण्याचे मतदारांना आवाहन करून याचे सूतोवाच केले होते.
तेच सूत्र कायम ठेवून पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, फडणवीस, खट्टर व दास या तिन्ही मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला आहे. त्यांच्या सरकारांची उत्तम कामगिरी हाच पक्षाचा विधानसभा निवडणुकांमधील प्रचाराचा मुख्य मुद्दा असेल. त्यामुळे पुन्हा सत्ता मिळाल्यावर हेच तीन मुख्यमंत्री त्या पदांवर कायम राहतील हे उघड आहे.
हा नेता पुढे म्हणाला की, फडणवीस, खट्टर व दास या तिघांनीही जनतेसमोर आपली स्वच्छ प्रतिमा ठेवली असून, भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजलेल्या या राज्यांना गेली पाच वर्षे कोणत्याही घोटाळ्याविना सुशासन दिले आहे. त्या- त्या राज्यांमधील सरकारांची उत्तम कामगिरी, केंद्रातील स्वपक्षीय मोदी सरकारने घेतलेले अनेक धाडसी निर्णय व विरोधी पक्षांमधील फाटाफूट या सर्वांचा फायदा
घेऊन या तिन्ही राज्यांमध्ये पुन्हा सत्तेवर येण्याची भाजपला पक्की खात्री आहे.
खास करून महाराष्ट्र व हरियाणात विरोधी पक्षांमधील अनेक नेते भाजपमध्ये सामील झाल्यानेही पक्षाला बळकटी मिळाली आहे.

त्यावेळी निकालानंतरच निवडले मुख्यमंत्री

महाराष्ट्र, हरियाणा व झारखंड या तीन राज्यांमध्ये २०१४ च्या विधानसभा निवडणुका भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी कोणाचेही नाव पुढे न करता लढविल्या होत्या व निकाल जाहीर झाल्यावरच मुख्यमंत्री निवडले गेले होते.
विधानसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रात २८८ पैकी १२२, हरियाणात ९० पैकी ४७ व झारखंडमध्ये ८१ पैकी ३७ जागा जिंकल्या होत्या.

Web Title: Fadnavis, Khattar and Das are the faces of the Chief Minister again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.