नवी दिल्ली : ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्षपूर्ती झाल्याचे निमित्ताने विरोधी पक्ष काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी पंतप्रधानांच्या भाषणावर जोरदार टीका केली. प. बंगालच्या विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने सरकारने ‘वंदे मातरम्’वर चर्चा घडवून आणली आणि लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांवरून लक्ष विचलित करण्याचा त्यांचा हेतू असल्याचा आरोप केला.
आपले उद्दिष्ट काय आहे, लोकांसाठी आपली जबाबदारी काय आहे, आपण ती कशी पूर्ण करत आहोत, या विषयांपेक्षा आपण राष्ट्रीय गीतावर चर्चा का करत आहोत, त्यावर कशी चर्चा होऊ शकते, असा खडा सवाल प्रियांका गांधी यांनी सरकारला विचारला. तुम्ही आम्हाला भूतकाळात डोकं खुपसून ठेवायला लावू इच्छिता कारण सरकारला वर्तमान आणि भविष्यकाळात पाहायचे नाही पंतप्रधानांचा आत्मविश्वास कमी होत चालला आहे, त्यांची धोरणे देशाला कमकुवत करत चालल्याचा आरोपही त्यांनी केला.
वंदे मातरम् केवळ गाण्यासाठी नाही
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश सिंह यांनी लोकसभेत चर्चेत भाग घेताना ‘वंदे मातरम् केवळ गाण्यासाठी नाही, तर आचरणातही असायला हवे,’ असे नमूद केले. मात्र, आज फुटीरवादी लोक या माध्यमातून देशात फूट पाडू इच्छित असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, ‘वंदे मातरम्’मधून स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात मिळालेली ऊर्जा आजही या गीताच्या माध्यमातून तेवढीच प्रखर असल्याचे लोकसभेचे सभापती ओम बिरला यांनी नमूद केले. चर्चेच्या प्रारंभी प्रस्तावनेत त्यांनी हे विचार मांडले.
‘वंदे मातरम्’च्या शताब्दी वर्षात आणीबाणी लागू करून काँग्रेसने देशाला अंधाराच्या दरीत लोटले, असे भाजप खासदार अनुराग ठाकूर म्हणाले. तर, तेलुगू देसमचे खासदार बी. बायरेड्डी शबरी यांनी या राष्ट्रीय गीतामधून देवी दुर्गाचा उल्लेख आणि ‘कमला’सारखे शब्द का काढले, हा प्रश्न बंगालमधील तृणमूल सरकार काँग्रेसला का विचारत नाही, अशा शब्दांत टीका केली.
या गीताने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले; मग चर्चेची गरज काय?
‘वंदे मातरम्’ची पहिली दोन कडवी राष्ट्रीय गीत म्हणून घेण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे घटना समिती आणि तिच्या सदस्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखे आहे.
आपण ज्या विषयावर चर्चा करत आहोत तो देशाच्या आत्म्याचा एक भाग आहे. जेव्हा आपण वंदे मातरम् चा उल्लेख करतो, तेव्हा आपल्याला आपल्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाची आठवण होते. या गाण्याने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे; मग चर्चेची गरज काय?
देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या लोकांवर नवे आरोप करण्यासाठी सरकारला ही चर्चा हवी होती. तुम्ही नेहरूंबद्दल बोलत राहता, तर एक काम करूया, चर्चेसाठी वेळ निश्चित करूया, त्यांच्यावर झालेल्या सर्व अपमानांची यादी करूया. त्यावर चर्चा करूया आणि हा विषय एकदाचा बंद करूया.
‘वंदे मातरम’वर अन्याय
ही तर तुष्टीकरणाच्या राजकारणाची सुरुवात
‘वंदे मातरम’वर झालेला अन्याय ही साधारण घटना नव्हती. काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाचा हा प्रारंभ होता, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेतील चर्चेत आक्रमकपणे भूमिका मांडली. याच कारणामुळे शेवटी देशाचे विभाजन झाल्याचेही ते म्हणाले.
‘वंदे मातरम’ला जो न्याय मिळायला
हवा होता तो मिळाला नाही हे सत्य स्वीकारले पाहिजे. स्वतंत्र भारतात राष्ट्रगीत व राष्ट्रीय गीतास समान दर्जा देण्याचे ठरले होते. परंतु, ‘वंदे मातरम’ तोडण्यात आले, असे सिंह म्हणाले.
हे राष्ट्रीय गीत परिपूर्ण आहे, परंतु ते अपूर्ण ठेवण्याचे प्रयत्न करण्यात आले. या महान राष्ट्रीय गीताची प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त करून देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. वंदे मातरम असो किंवा बंकिमचंद्र चटर्जी यांची ‘आनंदमठ’ कादंबरी असो, या दोन्ही कलाकृती कधीच विशिष्ट धर्माच्या विरोधात नव्हत्या.