प्रयत्नांची पराकाष्ठा; अखेरच्या क्षणी ‘विक्रम’ भरकटले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 03:00 AM2019-09-07T03:00:07+5:302019-09-07T03:00:16+5:30

पंतप्रधानांसह कोटी-कोटी भारतीयांनी रात्र जागून अनुभवला थरारक क्षण

Endeavor; 'Vikram' wandered, chandrayaan 2 landing on mars | प्रयत्नांची पराकाष्ठा; अखेरच्या क्षणी ‘विक्रम’ भरकटले

प्रयत्नांची पराकाष्ठा; अखेरच्या क्षणी ‘विक्रम’ भरकटले

Next

बंगळुरू : भारतीय चांद्रयान-२ चे विक्रम हे लँडर शनिवारी पहाटे १ वाजून ५५ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्याच्या बेतात असतानाच आॅर्बिटरचा आणि लँडरचा संपर्क तुटला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संपूर्ण देशाने रात्रभर जागून अनुभव घेतला. इस्रो लँडर उतरवण्याचे आटोकाट प्रयत्न करीत होते. यापूर्वी इस्रायलचे यान चंद्रावर कोसळले होते व त्यांची मोहीम अयशस्वी झाली होती.

लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटपर्यंत पोहोचले तोपर्यंत नियोजित दिशेने मार्गक्रमण सुरळीत चालू होते. त्यानंतर त्याचा संपर्क तुटला. त्यामुळे लँडरची दिशा आणि ठिकाण कळण्यात अडचणी निर्माण झाल्या. तथापि, पर्यायी योजनेच्या माध्यमातून आकडेवारी मिळविण्यासाठी शास्त्रज्ञ कसोशीने कामाला लागले होते. इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी सांगितले की, प्राप्त आकडेवारीचे विश्लेषण करण्यात येत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोच्या शास्त्रज्ञांना म्हणाले की, ही काही लहान मोहीम नव्हती. शास्त्रज्ञांनी हिंमत ठेवावी. पुन्हा संपर्क सुरू व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

देशाच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील हा ऐतिहासिक क्षण होता. चंद्राच्या या भागात आजपर्यंत कोणताच देश पोहोचू शकला नव्हता. तेथे ‘विक्रम’ लँड करणार होते. २२ जुलैपासून चांद्रयान-२ चा प्रवास सुरू झाला होता. विक्रम लँडरला चंद्रावर उतरवण्याची प्रक्रिया खूपच थरारक होती. ही प्रक्रिया सुरू झाली तेव्हा लँडरचे चार इंजिन प्रज्वलित करण्यात आले होते. यावेळी प्रणोदन प्रणालीसह विविध प्रणाली योग्य वेळी काम करीत होत्या. या काळात सर्वांच्याच मनात धाकधूक होती. लँडर उतरण्यास अवघी काही मिनिटे बाकी असताना त्यात अडचणी आल्या. लँडरचा संपर्क तुटला. त्याचा डाटा मिळेनासा झाला आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांसह सर्व भारतीय घोर निराशेच्या गर्तेत गेले. 

उत्सुकता... भीती... रोमांच... थरार... विश्वास... प्रत्येक क्षणाला बदलती परिस्थिती... अशा अनेक संमिश्र भावभावनांनी शनिवारची पहाट भारलेली होती. शुक्रवारी रात्रीपासूनच कोट्यवधी भारतीय टीव्हीसमोर ठाण मांडून बसलेले होते. एरव्ही क्रिकेटची मॅच पाहण्यासाठी किंवा चित्रपट पाहण्यासाठी ज्या तयारीनिशी भारतीय नागरिक टीव्हीसमोर बसतात त्याच तयारीने या रात्रीही बसले होते.
फरक एवढाच होता की, यावेळी ते भारताच्या आणि जगाच्याही इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज झाले होते. शुक्रवारच्या दिवसभरात सर्वांनी एकमेकांना सोशल मीडियावरून आजची रात्र जागून काढा, असे संदेशही पाठवलेले होते. त्यामुळे चांद्रयानाच्या लँडिंगबद्दल पुरेशी सजगता निर्माण झालेली होती. चांद्रयानाचे उड्डाण झाल्यापासून ते आजवरच्या त्याच्या प्रवासावर सर्वांची बारीक नजर होतीच.
 

Web Title: Endeavor; 'Vikram' wandered, chandrayaan 2 landing on mars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.