DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 22:21 IST2025-12-02T22:20:30+5:302025-12-02T22:21:04+5:30
DRDO: भारत आता अशा निवडक देशांच्या गटात सामील झाला आहे, ज्यांनी हाय-स्पीड डायनॅमिक इजेक्शन चाचणी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
DRDO: भारतातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. 2 डिसेंबर 2025 रोजी चंदीगडमध्ये लढाऊ विमानांसाठी तयार करण्यात आलेल्या स्वदेशी इजेक्शन सीटचे यशस्वी परीक्षण करण्यात आले. आतापर्यंत जगातील अत्यंत मोजक्या एव्हिएशन कंपन्यांकडेच या उच्च तंत्रज्ञानाच्या सीट विकसित करण्याची क्षमता होती.
800 किमी प्रतितास वेगावर यशस्वी चाचणी
सध्या भारतीय लढाऊ विमानांमध्ये प्रामुख्याने मार्टिन–बेकर कंपनीच्या इजेक्शन सीट्स बसवण्यात आलेल्या आहेत. परंतु DRDOच्या चंदीगडस्थित टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च लॅबोरेटरी (TBRL) ने 800 किमी प्रतितास वेगाने स्वदेशी एस्केप सिस्टिमची चाचणी घेऊन एक मोठे यश मिळवले.
या चाचणीत खालील महत्त्वाच्या घटकांचे प्रमाणीकरण झाले-
कॅनोपी सेवरन्स
इजेक्शन सिक्वेन्सिंग
एअरक्रू रिकव्हरी सिस्टीम
भारत जगातील निवडक देशांच्या पंक्तीत
ही चाचणी हवाई व जमिनीवरील इमेजिंग सिस्टिमच्या साहाय्याने रेकॉर्ड करण्यात आली. भारतीय वायुसेना (IAF), इंस्टीट्यूट ऑफ एअरोस्पेस मेडिसिन आणि सर्टिफिकेशन संस्थेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष निरीक्षण केले.
जगातील फक्त अमेरिका, रशिया आणि फ्रान्स सारखे अत्याधुनिक देशच अशा उच्च-गती डायनॅमिक इजेक्शन चाचण्या करू शकतात.
या यशामुळे भारतदेखील आता या निवडक देशांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. हे परीक्षण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते कारण यावरच प्रत्यक्ष उड्डाणादरम्यान पायलटची सुरक्षा सुनिश्चित होते.
Defence Research and Development Organization (DRDO) has successfully conducted a high-speed rocket-sled test of fighter aircraft escape system at precisely controlled velocity of 800 km/h- validating canopy severance, ejection sequencing and complete aircrew-recovery at Rail… pic.twitter.com/G19PJOV6yD
— रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) December 2, 2025
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व DRDO अध्यक्षांची प्रतिक्रिया
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी चाचणीबद्दल DRDO, भारतीय वायुसेना, ADA, HAL आणि संबंधित उद्योगांना अभिनंदन दिले. त्यांनी याला भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा म्हटले.
DRDOचे अध्यक्ष डॉ. समीर वी. कामत यांनीही संपूर्ण टीमचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, हे यश तेजस लढाऊ विमान आणि आगामी AMCA प्रकल्पासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.