Delhi Violence: हिंसाचारासाठी परदेशातून पैसे आले; अमित शहा यांची राज्यसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 01:42 AM2020-03-13T01:42:53+5:302020-03-13T06:43:35+5:30

पोलिसांनी ३६ तासांत हिंसाचार नियंत्रणात आणला

Delhi Violence: Money from abroad for violence; Amit Shah's information in Rajya Sabha | Delhi Violence: हिंसाचारासाठी परदेशातून पैसे आले; अमित शहा यांची राज्यसभेत माहिती

Delhi Violence: हिंसाचारासाठी परदेशातून पैसे आले; अमित शहा यांची राज्यसभेत माहिती

Next

नवी दिल्ली : उत्तर पूर्व दिल्लीत झालेल्या हिंसाचारासाठी परदेशातून पैसे आले आणि ते २४ फेब्रुवारीपूर्वी वाटण्यात आले. यात संबंध असलेल्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी राज्यसभेत दिली.

हिंसाचारप्रकरणी बुधवारी लोकसभेत चर्चा केल्यानंतर गुरुवारी राज्यसभेत घमासान चर्चा झाली. सभापती डॉ. सत्यनारायण जाटिया यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे आनंद शर्मा, भाजपचे प्रकाश जावडेकर, सपाचे जावेद अस्ली खान, बीजू जनता दलाचे प्रसन्न आचार्य, तेलंगाणा राष्ट्र समितीचे बंदा प्रकाश, बसपाचे अशोक सिद्धार्थ, आपचे संजय सिंह, अकाली दलाचे नरेश गुजराल, द्रमुकचे तिरुची शिवा आदी खासदारांनी भाषणे केली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर गृहमंत्री शहा यांनी त्यांच्या भाषणात हिंसाचाराबाबतचा खुलासा केला तसेच विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. हिंसाचार कुणी घडविला यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यानुसार १९२२ जणांची ओळख पटविण्यात आली आहे. त्यांना पकडण्यासाठी ४०हून अधिक विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. परदेशातून आलेले पैसे वाटण्यात आले आणि त्यानंतर हिंसाचार झाला आहे. विविध खात्यांमध्ये पैसे टाकण्यात आले. यात सहभागी असलेल्यांना पाताळातूनही शोधून काढू, असे शहा यांनी सभागृहास सांगितले. हिंसाचार होणार असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याची शहानिशा करण्याचे काम सुरू असतानाच हिंसाचार सुरू झाला. पोलिसांनी ३६ तासात हिंसाचार नियंत्रणात आणला, तो वाढू दिला नाही किंवा दिल्लीच्या अन्य भागातही तो होऊ दिला नाही, असे ते म्हणाले.

आणखी एकास पकडले
गुप्तचर विभागाचा कर्मचारी अंकित शर्मा याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आणखी एकाला पकडले आहे. सलमान ऊर्फ नन्हे असे त्याचे नाव आहे. उत्तर पूर्व दिल्लीतील हिंसाचारात शर्मा यांची हत्या झाली आहे. शर्मा यांचा मृतदेह चांदबाग येथील नाल्यात आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी आपचा निलंबित माजी नगरसेवक ताहीर हुसैन याला अटक केली आहे. सलमानची नेमकी काय भूमिका आहे, याची चौकशी आता पोलीस करणार आहेत. पोलिसांना सलमानच्या सहभागाचे काही पुरावे मिळाले आहेत.

कागदपत्र घेणार नाही
राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर)मध्ये कुणाकडूनही काहीही कागदपत्रे मागितली जाणार नाहीत. तसेच, कुणाच्याही नावापुढे संशयास्पद असेही लिहीले जाणार नाही, असे शहा यांनी उत्तर देताना स्पष्ट केले. त्यामुळे याबाबत असलेला संभ्रम दूर झाला आहे.

Web Title: Delhi Violence: Money from abroad for violence; Amit Shah's information in Rajya Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.