आयपीएस पुरुषोत्तम शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाली...

By सायली शिर्के | Published: September 30, 2020 02:46 PM2020-09-30T14:46:36+5:302020-09-30T14:55:05+5:30

पुरुषोत्तम शर्मा यांच्या मुलाने त्यांची तक्रार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली असून वडिलांवर कारवाईची मागणी केली आहे. मात्र आता वडिलांचा बचाव करण्यासाठी त्यांच्या मुलीने पुढाकार घेतला आहे. 

daughter in support of ips officer purushottam sharma in case of assault on wife | आयपीएस पुरुषोत्तम शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाली...

आयपीएस पुरुषोत्तम शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाली...

Next

भोपाळ - आयपीएस पुरुषोत्तम शर्मा यांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी जोरदार व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये शर्मा त्यांच्य़ा पत्नीला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. धक्कादायक म्हणजे शर्मा यांना प्रेयसीसोबत त्यांच्या पत्नीने रंगेहाथ पकडल्याने ही मारहाण केल्याचं कबूल केलं आहे. पत्नीने प्रेयसीसोबत पकडल्याने भडकलेल्या आयपीएस शर्मा यांनी घरी येत पत्नीवर हल्ला केला. पुरुषोत्तम शर्मा यांच्या मुलाने त्यांची तक्रार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली असून वडिलांवर कारवाईची मागणी केली आहे. मात्र आता वडिलांचा बचाव करण्यासाठी त्यांच्या मुलीने पुढाकार घेतला आहे. 

पुरुषोत्तम शर्मा यांची मुलगी देवांशी ही वडिलांचं समर्थन करण्यासाठी पुढे आली आहे. देवांशीने मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना याबाबत एक पत्र लिहिलं आहे. तसेच वडिलांविरोधात कोणतीही कारवाई न करण्याची विनंती केली आहे. आईची मानसिक स्थिती ठीक नाही. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना देखील करावा लागत असल्याचं मुलीने पत्रात म्हटलं आहे. मुलीने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याने शर्मा यांच्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

पत्नीला केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल

शर्मा यांनी पत्नीला केलेल्या मारहाणीचा कोणीतरी व्हिडीओ काढला असून तो जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आयपीएस शर्मा हे त्यांच्या पत्नीला मारहाण करताना दिसत आहेत. तर पत्नीने बचावासाठी त्यांच्यावर घरातील कात्री घेतली आहे. तसेच शर्मा पत्नीला शिव्यांची लाखोली वाहत आहेत. या व्हिडीओत घरातील दोन कर्मचारी ही हाणामारी सोडविण्याच्या प्रय़त्नात दिसत आहेत. शर्मा यांच्या मुलाने वडिलांच्या या कृत्याचा हा व्हिडीओ गृह मंत्री नरोत्तम मिश्रा, डीजीपी आणि अन्य पोलीस अधिकाऱ्यांना पाठविला आहे. 

मारहाणीच्या व्हिडीओवर शर्मा यांचं स्पष्टीकरण 

मारहाणीच्या व्हिडीओनंतर शर्मा यांनी स्पष्टीकरण देताना मी कोणताही गुन्हा केलेला नाही. हा माझा कौटुंबिक प्रश्न आहे. ती जर माझ्यावर नाराज असेल तर माझ्यासोबत का राहत आहे. माझ्या पैशांचा वापर करते, परदेशात फिरायला जाते. या प्रश्नाला मी स्वत: सोडवेन. सेल्फ डिफेन्समध्ये माझ्याकडून केवळ झटापट झाली आहे. आता पत्नी आणि मुलगाच हा व्हिडीओ व्हायरल का केला ते सांगू शकतील असं म्हटलं आहे. 

गर्लफ्रेंडच्या बेडरुममध्ये हाय व्होल्टेज ड्रामा; आयपीएस पुरुषोत्तम शर्मा निलंबित

शर्मा यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ त्यांच्या पत्नीने शर्मांच्या गर्लफ्रेंडच्या फ्लॅटवर बनविला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरच शर्मा पत्नीवर भडकले होते. यानंतर शर्मा यांच्यावर सरकारने कारवाई केली असून त्यांना एडीजी पदावरून हटविण्यात आले आहे. या व्हिडीओवर शर्मा यांनी स्पष्टीकरण दिले असून मी जिथे जिथे जात असे पत्नी माझ्या मागे येत होती, असा आरोप केला आहे. पत्नीला मारहाण करण्यासाठी हाच आताचा व्हिडीओ कारणीभूत होता. यानंतर या मारहाणीचाही व्हिडीओ बनवून तो त्यांच्याच आयआरएस अधिकारी असलेल्या मुलाने मुख्यमंत्री, गृहमंत्री ते मोठमोठे पोलीस अधिकाऱ्यांना पाठविला होता.

 

Web Title: daughter in support of ips officer purushottam sharma in case of assault on wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.