'जेवाद' चक्रीवादळाचे सावट! अनेक राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, IMDकडून अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 09:22 AM2021-12-02T09:22:40+5:302021-12-02T09:24:31+5:30

हवामान विभागाने सांगितल्यानुसार, 3-4 डिसेंबरपर्यंत अनेक राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Cyclone Jewad and weather update; IMD issues alert in many states | 'जेवाद' चक्रीवादळाचे सावट! अनेक राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, IMDकडून अलर्ट जारी

'जेवाद' चक्रीवादळाचे सावट! अनेक राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, IMDकडून अलर्ट जारी

googlenewsNext

मुंबई: मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मंगळवार-बुधवारी मध्यरात्रीपासून या अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. रात्री पाऊस पडल्यानंतर मध्येच थांबला होता. मात्र बुधवारी सकाळपासून पुन्हा पावसाने जोर धरला.  महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, मराठवाडा आणि कोकण भागासह अनेक ठिकाणी 3 डिसेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

दरम्यान, डिसेंबर महिन्यात हा अचानक पाऊस येण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे अग्नेय अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. हे पूर्व-मध्य अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे होत आहे. त्यामुळे येत्या 24 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अनेक राज्यांमध्ये 'जेवाद' चक्रीवादळाचे सावट!

हवामानातील या अचानक बदलामुळे केवळ महाराष्ट्रच नाही तर अनेक राज्यांत पाऊस पडत आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे या वादळी चक्रीवादळाची स्थिती तयार झाली आहे. अशा परिस्थितीत आता हवामान खात्याने 'जेवाद' चक्रीवादळाबाबत अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर पश्चिम आणि मध्य भारताच्या लगतच्या भागात वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार करण्यात आला आहे. यामुळे हवामानात बदल झाला आहे. हवामानातील बदलामुळे 3 डिसेंबरपर्यंत देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडेल. 3 डिसेंबर रोजी पावसाचा जोर आणखी वाढेल आणि त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल.

'जेवाद' 4 डिसेंबरला आंध्राच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता

अंदमान समुद्राच्या मध्यभागी असलेले कमी दाबाचे क्षेत्र बुधवारपर्यंत पश्चिम-उत्तर आणि पश्चिमेकडे सरकेल, असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला होता. याच कारणास्तव बुधवारी महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यानंतर बंगालच्या उपसागरात त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल. आतापर्यंत हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणेच घडले आहे. आता हे वादळ 4 डिसेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारी भागात धडकणार आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडेल. 

गुजरातमध्येही मुसळधार पावसाचा इशारा

अरबी समुद्रातील या चक्रीवादळामुळे आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे गुजरातमध्येही येत्या 24 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांना त्यांची कापणी केलेली पिके सुरक्षित स्थळी नेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

गुजरातच्या समुद्रात 10-15 मच्छीमार बेपत्ता
गुजरातमधील गिर सोमनाथमध्ये रात्री उशिरा पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे 13 ते 15 बोटी समुद्रात बुडाल्याचं वृत्त आहे. या अपघातात 10 ते 15 मच्छीमार बेपत्ता झाल्याची माहिती आहे. सध्या त्या मच्छीमारांचा शोध सुरू आहे. पण, याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.


 

Read in English

Web Title: Cyclone Jewad and weather update; IMD issues alert in many states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.