राज्यातील शिवमंदिरात भाविकांची गर्दी, जाणून घ्या 'महाशिवरात्री'ची कथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 09:56 AM2019-03-04T09:56:43+5:302019-03-04T09:57:07+5:30

देशभर महाशिवरात्री एकादशीनिमित्त भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.

The crowd of devotees at Shiv temple, know the story of 'Mahashivratri' ... | राज्यातील शिवमंदिरात भाविकांची गर्दी, जाणून घ्या 'महाशिवरात्री'ची कथा...

राज्यातील शिवमंदिरात भाविकांची गर्दी, जाणून घ्या 'महाशिवरात्री'ची कथा...

googlenewsNext

मुंबई - देशभर महाशिवरात्री एकादशीनिमित्त भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. त्यातच, देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी राज्यात असलेल्या तीन ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणीही मोठी गर्दी झाली आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर, औरंगाबादेतील घृष्णेश्वर आणि पुण्यातील भिमांशकर ही तीन तिर्थक्षेत्र हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहेत. तसेच परळी वैजिनाथ आणि औंढ नागनाथ यांनाही महत्त्वाची ज्योतिर्लिंग मानण्यात येते. 

दरम्यान, वेतनवाढीच्या मागणीसाठी त्र्यंबकेश्वर येथील देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे महाशिवरात्रीस होणारे जादा कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. देवस्थान ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर वेगळे  नियोजन करावे लागले आहे. सध्या तुंगार मंडळी ट्रस्टचे कर्मचारी गावातील बचत गटांच्या महिला काही सेवाभावी युवक पुरोहित संघाचे कार्यकर्ते याशिवाय स्वतः विश्वस्त मंडळाचे सदस्य गर्दीचे नियोजन उभे राहुन करतांना दिसत आहेत. 

महाशिवरात्री एकादशीनिमित्त सर्वच भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यातील भिमाशंकर, नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, परळीचे वैजिनाथ, परभणीचे औंढ नागनाथ आणि औरंगाबाद येथील घृष्णेश्वर मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त यात्राही भरल्या जातात. महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी आणि अभिषेक करण्यासाठी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत.   

महाशिवरात्रीची कथा

महाशिवरात्रीचा दिवस. एक पारधी शिकार करायची म्हणून जंगलात गेला. जलाशयाच्या एका वृक्षावर जाऊन बसला. पाणी पिण्यासाठी म्हणून एखादं सावज आलं, एखादा प्राणी आला की त्याची शिकार करायची हा हेतू. दुपारपासून धनुष्य बाण सज्ज करून तो बसला खरा !… पण… दिवस गेला-संध्याकाळ झाली, सूर्य अस्ताला गेला, तिन्ही सांजा होऊ लागल्या तरी एकही प्राणी त्या जलाशयाकडे आला नाही अन्‌ शिकार मिळालीही नाही. तेवढ्यात काही हरणं पाणी पिण्यासाठी म्हणून तिथं आली. पारध्याने धनुष्याची दोरी मागे खेचली. तो आता बाण सोडणार तोच त्या हरिणांचा प्रमुख पुढे आला आणि पारध्याला म्हणाला, हे पारध्या ! तू तर शिकारी आहेस. शिकार करणे हा तुझा धर्म आहे. तू आम्हाला मारणार हे ही खरं आहे. पण त्या आधी आमची एक विनंती ऐक. आम्ही एकदाच आमचं कर्तव्य पूर्ण करून येतो. आमच्या कुटुंबियांना भेटून येतो मग तू आम्हाला मार. खरं तर हातातोंडाशी आलेली शिकार जाऊ कशी द्यायची. पण, त्या हरिणाच्या प्रमुखांनी परत येण्याच वचन दिलं. तेव्हा पारधी म्हणाला, 'ठीक आहे उद्या सकाळच्या सूर्योदयापूर्वी मात्र तुम्ही आलं पाहिजे'.
हरिणाच्या कळपांनी ते मान्य केलं आणि ती निघून गेली. आता, रात्र कशी काढायची. तोच दूरवरच्या मंदिरातून घंटानाद ऐकू आला. पाठोपाठ ॐ नमः शिवाय म्हटले जाऊ लागले. नकळत नाममंत्राची पारध्याला गोडी लागली. सहज चाळा म्हणून तो ज्या वृक्षावर बसला होता, त्याची पानं तोडून तो खाली टाकू लागला. तो नेमका बेलाचा वृक्ष होता. ती बेलाची पाने पारध्याच्या हातून नेमकी वृक्षाखालच्या शिवपिंडीवर पडत होती. नकळत त्याच्या हातून ती शिवपूजा घडत होती. तोच ते हरिण आले आणि म्हणाले, 'पारध्या सोड बाण, मी माझं कुटुंब प्रमुखाचं कर्तव्य पूर्ण करून आलोय. मला आता मार…' इतक्यात एक हरिणी पुढे येऊन म्हणाली. 'त्याला नको मला मार, तो माझा पती आहे. त्याच्या आधी मला मार. मला माझा पत्नी धर्म पाळू दे'. तेवढ्यात ती पाडसं पुढे आली आणि म्हणाली त्या दोघांआधी आम्हाला मार. ते आमचे आई वडील आहेत. आम्हाला आमचा पुत्र धर्म पाळू दे. त्यांच रक्षण करू दे.

एका पाठोपाठ एक अशी प्रत्येकाचीच दुसऱ्याला वाचवायची व कर्तव्य दक्षतेची चढाओढ पाहिली अन पारध्याने विचार केला, हे प्राणी आपला धर्म कर्तव्य पाळतात तर मी का दयेचा धर्म पाळू नये. त्याची शिकार करून पापाचा धनी का होऊ. त्यामुळे, पारध्यानं सर्वानाच जीवनदान दिले. त्यानंतर, भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी सर्वांचाच उद्धार केला. हरिणांना मृग नक्षत्र म्हणून अन्‌ पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान दिले. हे घडले तो दिवस होता महाशिवरात्रीचा. तेव्हापासून महाशिवरात्री हा दिवस उपवासाचा आणि शिवपुजेचा दिवस म्हणून साजरा होतो. कारण, नकळतपणे त्यादिवशी पारध्यासह सर्वांनाच उपवास घडला होता. 

Web Title: The crowd of devotees at Shiv temple, know the story of 'Mahashivratri' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.