कोविड पूर्ण बरा व्हायला लागतात सुमारे तीन महिने; 'ही' काळजी घेतल्यास काळी बुरशी होणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 07:07 AM2021-05-10T07:07:27+5:302021-05-11T16:20:05+5:30

लोकमत यू ट्युबसाठी त्यांनी सविस्तर मुलाखत दिली. मधुमेहाचे रुग्ण, त्यांना होणारा कोरोना आणि  म्युकर मायकॉसिस या विषयावर त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली आहेत.

Covid takes about three months to fully heal - Dr. Shashank Joshi | कोविड पूर्ण बरा व्हायला लागतात सुमारे तीन महिने; 'ही' काळजी घेतल्यास काळी बुरशी होणार नाही!

कोविड पूर्ण बरा व्हायला लागतात सुमारे तीन महिने; 'ही' काळजी घेतल्यास काळी बुरशी होणार नाही!

Next


अतुल कुलकर्णी -
मुंबई : कोविड पूर्ण बरा होण्यासाठी तीन महिने लागतात. या कालावधीमध्ये आपण ताप, नाडीचे ठोके, रक्तदाब, शरीरातील साखरेचे प्रमाण आणि ऑक्सिजनची पातळी बारकाईने तपासत राहिले पाहिजे. स्वतःची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. मन आनंदी ठेवले पाहिजे. एवढे कराल, तर तुम्हाला काहीही होणार नाही, अशी ठाम ग्वाही टास्क फोर्सचे सदस्य आणि ज्येष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी दिली.

लोकमत यू ट्युबसाठी त्यांनी सविस्तर मुलाखत दिली. मधुमेहाचे रुग्ण, त्यांना होणारा कोरोना आणि  म्युकर मायकॉसिस या विषयावर त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. ही पूर्ण मुलाखत लोकमत यू ट्युबवर उपलब्ध आहे. कोविडप्रमाणे मधुमेह हा पॅनडेमिकचाच एक प्रकार आहे. त्यामुळे मधुमेह आणि कोविड दोन्हीचे एकत्रित येणे जास्त धोकादायक आहे. त्याची काही निश्चित कारणे आहेत. अनेकांना कोरोनामुळे आपल्याला मधुमेह असल्याचे लक्षात आले आहे. स्टेरॉइडच्या वापरामुळे शरीरातील साखर वाढते आणि व्हायरल इन्फेक्शनमुळे जे मधुमेहाच्या वाटेवर आहेत, त्यांच्या स्वादुपिंडावर कोविडचे विषाणू हल्ला करतात. त्यातून स्वादुपिंडाला इजा झाली की मधुमेह समोर येतो व पुढच्या अडचणी निर्माण होतात. म्हणून मधुमेह असणाऱ्या कोरोना झालेल्या रुग्णांनी जास्त काळजी घेणे आवश्यक आहे, असेही डॉ. जोशी म्हणाले.

संतुलित आहार, नियमित व्यायाम, सूर्यनमस्कार, प्राणायाम, उठाबशा काढणे, फुप्फुसांना व्यायाम देणे, सात तास झोप घेणे आणि साखरेवर नियंत्रण ठेवणे या गोष्टी आता जीवनाचा भाग बनवल्या पाहिजेत. मधुमेही रुग्णांना कोरोनातून बाहेर पडताना या गोष्टीत नियमितता नसेल तर त्रास होतो. इन्सुलिन  चालू असणाऱ्यांनी देखील कोरोना झाल्यानंतर स्वतःची काळजी घेतली पाहिजे. मधुमेही रुग्णांनी हळूहळू खाणे, चावून-चावून खाणे याकडे लक्ष दिले पाहिजे. वेगाने जेवण केल्यामुळे साखर क्षणात वाढते आणि क्षणात कमी होते. त्यामुळे आपण कसे जेवतो, हे जास्त महत्त्वाचे आहे.

म्युकर मायकॉसिस म्हणजे काळी बुरशी हा दुर्मीळ आजार आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. ज्या रुग्णांना तीव्र स्वरूपाचा कोरोना होतो, त्यांच्यावर जर स्टेरॉइडचा भडिमार झाला तर त्याच्या अतिवापरामुळे हा आजार होऊ शकतो. या कालावधीमध्ये रुग्णाच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. रेमडेसिविर सारख्या इंजेक्शनने काहीही फायदा होत नाही. त्याच्या मागे पळू नका. मात्र त्याचा अतिवापर केला तर त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतात. काळी बुरशी होऊ नये यासाठी स्टेरॉइडचा कमी वापर करणे महत्त्वाचे आहे. बरे झाल्यानंतर रोज कोमट पाण्याने गुळण्या करा. तोंड, नाक साफ ठेवा. ‘ओरल हायजिन’कडे लक्ष द्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लसीकरणाने धोका कमी
लसीकरणामुळे कोरोना होत नाही, असे नाही. कोणतीही लस इन्फेक्शन थांबवू शकत नाही. मात्र लसीचे दोन डोस घेणाऱ्यांना जर कोरोना झाला तर तो जीवघेणा ठरत नाही. त्यातून ते बरे होतात. आपल्याकडे जी लस उपलब्ध आहे, ती घेतली पाहिजे. कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस एक ते दीड महिन्याच्या आत, कोव्हिशिल्डचा दुसरा डोस दोन ते तीन महिन्यांच्या आत आणि कोरोनातून बरे झालेल्यांनी तीन महिन्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घ्यावी. 

येत्या काळात सहा ते सात वेगवेगळ्या लसी देशात येतील. मात्र ज्यांनी देशातल्या लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांनी परदेशातून नवीन लस येत आहे, म्हणून लस घेण्याच्या मागे लागू नये. सहा ते आठ महिन्यांत नव्या सूचना येतील, त्यानुसारच निर्णय घ्यावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोणत्या मधुमेहींनी काळजी घ्यावी?
मधुमेहाचे चार प्रकार आहेत. कोणत्या प्रकारातल्या मधुमेहींनी जास्त काळजी घेतली पाहिजे? तिसरी लाट कोणत्या प्रकारच्या मधुमेहींसाठी अडचणीची असणार आहे? तसेच ए बी सी डी इ एफ या पाच अक्षरानुसार मधुमेहींनी कोणती काळजी घेतली पाहिजे? याची उत्तरेही डॉ. शशांक जोशी यांनी दिली आहेत.

Web Title: Covid takes about three months to fully heal - Dr. Shashank Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.