Coronavirus : जनता कर्फ्यूला देशभरात सुरुवात; संसर्ग टाळण्याच्या मोहिमेत लोकांचा उत्स्फूर्त सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 05:30 AM2020-03-22T05:30:58+5:302020-03-22T07:36:10+5:30

Coronavirus : अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे बंद होत्या. बहुतांश ठिकाणी लोकांनी स्वत:हूनच घराबाहेर पडण्याचे टाळले.

Coronavirus: masses curfew nationwide launch; Spontaneous involvement of people in the prevention of infection | Coronavirus : जनता कर्फ्यूला देशभरात सुरुवात; संसर्ग टाळण्याच्या मोहिमेत लोकांचा उत्स्फूर्त सहभाग

Coronavirus : जनता कर्फ्यूला देशभरात सुरुवात; संसर्ग टाळण्याच्या मोहिमेत लोकांचा उत्स्फूर्त सहभाग

Next

मुंबई/नवी दिल्ली : कोरोना विषाणुच्या संसर्गाचा एकजुटीने व एकदिलाने सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार जनता कर्फ्यूला रविवारी सकाळी सुरुवात होणार असली तरी शनिवारी सकाळपासूनच महाराष्ट्रासह देशभरात अघोषित संचारबंदी सुरू झाली होती. आपापल्या गावी निघून जाणाऱ्यांची रेल्वे स्थानकांवर झालेली गर्दी वगळता देशभरात सामसूम व शुकशुकाटच होता.

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे बंद होत्या. बहुतांश ठिकाणी लोकांनी स्वत:हूनच घराबाहेर पडण्याचे टाळले. मात्र आदेशानंतरही ज्यांनी दुकाने वा आस्थापने बंद ठेवली नाहीत, ती बंद करण्यास पोलिसांनी भाग पाडले. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शहरे आणि ग्रामीण भागात जणू आजपासूनच लोकांनी बंद सुरू केला.

रविवारी सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंतही जनतेची संचारबंदी स्वयंस्फूर्त असेल, यात वाद नाही. या काळात मुंबई व काही शहरांतील उपनगरी सेवा वगळता, एकही रेल्वेगाडी धावणार नाही. बहुतांश विमान उड्डाणे बंद असतील आणि परदेशांतून येणाºया सर्व विमानांना भारतात उतरण्यास शनिवार मध्यरात्रीपासूनच बंदी घालण्यात आली आहे. शिवाय प्रवासी असतील, तरच एसटीच्या बसेस सोडण्यात येतील.

कोरोना विषाणुचा संसर्ग एकमेकांच्या जवळ जाण्याने होत असल्यामुळेच लोकांनी गर्दी करू नये, एकमेकांच्या जवळ जाऊ नये आणि घरीच थांबावे, यासाठी पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूची कल्पना मांडली आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी लोकांनी या कर्फ्यूमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

हा होईल परिणाम-

  • राज्यात दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलला
  • रेल्वेच्या ४0 टक्के
  • उपनगरी गाड्या रद्द
  • विमानसेवा पूर्ण बंद
  • आंतरराष्ट्रीय विमानांना
  • देशात प्रवेश नाही
  • एसटीच्या फेऱ्या गरजेनुसार
  • आंतरराज्य बसची ये-जा बंद
  • खासगी बसेसवर पूर्ण बंदी
  • दूर पल्ल्याच्या सर्व गाड्या बंद
  • खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्यांची तपासणी
  • रुग्णालयात दाखल
  • झालेल्या कोणालाही ताप, खोकला, सर्दी असल्यास
  • वा श्वासोच्छवासाचा त्रास असल्यास त्यांची कोरोनाशी संबंधित तपासणी होणार


राज्यात ६४ रुग्ण, शनिवारी आढळलेले नवे रुग्ण : १२

राज्यात कोरोनाचे पुण्यात २, मुंबईत ८, यवतमाळ व कल्याणमध्ये प्रत्येकी १ असे १२ नवीन रुग्ण शनिवारी आढळले. त्यामुळे आता राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ६४ झाली आहे. दरम्यान, होत असलेल्या संसर्गाच्या सामाजिक प्रसाराची चाचपणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

देशात ३२९ बाधित (यात बरे झालेले २३ व पाच मृत यांचा समावेश आहे.)

शनिवारी आढळलेले नवे रुग्ण : ६0

कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या सात हजार व्यक्तींचा देशात ठिकठिकाणी मागोवा घेतला जात आहे. त्यांच्या तपासणीतून सामुदायिक संसर्ग झाला आहे का, हे स्पष्ट होईल. तसे एखादे प्रकरण आढळले तरी सर्व तपासण्या अधिक कडक करणार.
- केंद्रीय आरोग्य मंत्रालय

Web Title: Coronavirus: masses curfew nationwide launch; Spontaneous involvement of people in the prevention of infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.