व्होडाफोनच्या वक्तव्यावरून वादंग; सरकारने व्यक्त केली तीव्र नापसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 05:07 AM2019-11-14T05:07:44+5:302019-11-14T05:08:15+5:30

व्होडाफोनचे सीईओ निक रिड यांच्या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाला

Controversy over Vodafone's statement; The government expressed strong disapproval | व्होडाफोनच्या वक्तव्यावरून वादंग; सरकारने व्यक्त केली तीव्र नापसंती

व्होडाफोनच्या वक्तव्यावरून वादंग; सरकारने व्यक्त केली तीव्र नापसंती

googlenewsNext

संतोष ठाकूर 
नवी दिल्ली : व्होडाफोनचे सीईओ निक रिड यांच्या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाला असून, त्याबाबत सरकारने नापसंती व्यक्त केल्यानंतर निक रिड यांनी दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्र पाठवून माफी मागितल्याचे वृत्त आहे. बातम्यांमध्ये आपले वक्तव्य चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आल्याचा खुलासा रिड यांनी केल्याचे समजते.
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रसाद यांना पाठविलेल्या पत्रात रिड यांनी म्हटले आहे की, कंपनीसाठी भारत हा मोठा बाजार आहे. येथे मोठी गुंतवणूक केली आहे. यापुढेही भारतासोबतचे संबंध कंपनी कायम ठेवील.
सदर प्रतिनिधीने कंपनीला संपर्क परंतु हे वृत्त लिहून होईपर्यंत त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळू शकले नाही. आयडिया-व्होडाफोनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, याप्रकरणी कंपनीचे प्रमुख आदित्य बिर्ला यांच्या वतीने दूरसंचारमंत्री प्रसाद यांच्याशी थेट बोलणे होईल. कंपनीकडून कोणतेही सार्वजनिक वक्तव्य केले जाणार नाही.
रिड यांनी पत्रात लिहिले की, माध्यमांमध्ये आलेले आपले वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दिले आहे. ते आमच्या विचारांचे प्रतिनिधत्व करीत नाही. त्याबद्दल आम्हाला खेद आहे. येत्या सप्ताहात आपण स्वत: भारत सरकारशी संपर्क करू. दूरसंचार क्षेत्राच्या वाईट स्थितीवर उपाय शोधण्यासाठी सचिवांचा समूह स्थापन करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो. हे एक गंभीर पाऊल आहे. यातून मदत पॅकेजबाबत काही तरी सकारात्मक निर्णय होईल, अशी आम्हाला आशा वाटते.
>व्यावसायिक क्षेत्रात खळबळ
निक रिड यांच्या हवाल्याने आलेल्या वृत्तात म्हटले होते की, ‘व्होडाफोन भारतातील व्यवसाय बंद करू शकते. यास सरकारची धोरणेही जबाबदार आहेत. रिड यांच्या या वक्तव्याने व्यावसायिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दूरसंचार मंत्रालयाने त्याची गंभीर दखल घेऊन आयडिया-व्होडाफोनकडून खुलासा मागविला होता. जिओच्या आगमनानंतर भारतीय दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा जीवघेणी झाली असून, तिचा सामना करण्यासाठी आयडिया आणि व्होडाफोन या कंपन्यांनी विलीनीकरण करून एकच कंपनी स्थापन केली आहे.

Web Title: Controversy over Vodafone's statement; The government expressed strong disapproval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.