"राहुल गांधींनी 6 महिन्यांपूर्वी दिला होता इशारा", जीडीपीवरून प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 01:15 PM2020-09-01T13:15:48+5:302020-09-01T13:48:03+5:30

देशाच्या पहिल्या तिमाहीमध्ये सकल घरेलू उत्पादनात (GDP) 23.9 टक्क्यांची ऐतिहासिक घसरण नोंदविण्यात आली आहे.

congress priyanka gandhi vadra attacks modi government on gdp data | "राहुल गांधींनी 6 महिन्यांपूर्वी दिला होता इशारा", जीडीपीवरून प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

"राहुल गांधींनी 6 महिन्यांपूर्वी दिला होता इशारा", जीडीपीवरून प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

googlenewsNext
ठळक मुद्दे'कोरोना संकटावेळी हत्तीच्या दातांसारखे दाखवणारे एक पॅकेज घोषित झाले. मात्र, आजची परिस्थिती पाहा.'

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर संकट आलेले असताना त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम दिसून आला आहे. देशाच्या पहिल्या तिमाहीमध्ये सकल घरेलू उत्पादनात (GDP) 23.9 टक्क्यांची ऐतिहासिक घसरण नोंदविण्यात आली आहे. यावरून काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

सहा महिन्यापूर्वी राहुल गांधी यांनी आर्थिक त्सुनामी येणार असल्याचे सांगितले होते, असे म्हणत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विटरवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. "सहा महिन्यांपूर्वी राहुल गांधी आर्थिक त्सुनामीबाबत बोलले होते. कोरोना संकटावेळी हत्तीच्या दातांसारखे दाखवणारे एक पॅकेज घोषित झाले. मात्र, आजची परिस्थिती पाहा. जीडीपी @ -23.9 टक्के, भाजपा सरकारने अर्थव्यवस्थेला बुडविले," असे ट्विट प्रियंका गांधी यांनी केले आहे.

याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीडीपीवरून घेराव घातला आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट करून म्हटले की, "जीडीपी 24% घसरला आहे. स्वातंत्र्य भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण आहे. प्रत्येक इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत राहणे, हे सरकारचे दुर्दैव आहे." याचबरोबर, काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. "मोदीजी, आता तरी मान्य करा की ज्याला तुम्ही "मास्टर स्ट्रोक" म्हटले, तो खरंतर "आपत्ती स्ट्रोक" होता! नोटाबंदी, चुकीची जीएसटी आणि देशबंदी (लॉकआऊट), असे रणदीत सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2020-21 च्या एप्रिल ते जून या तिमाहिचे आकडे जाहीर केले आहेत. मंत्रालयाच्या आकड्यांनुसार पहिल्या तिमाहीत स्थिर किंमतीवर म्हणजेच रियल जीडीपी 26.90 लाख कोटी रुपये राहिली आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीत ही जीडीपी 35.35 लाख कोटी रुपये होती. अशाप्रकारे यामध्ये 23.9 टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या वर्षी जीडीपीमध्ये 5.2 टक्क्यांची वाढ झाली होती. देशात लॉकडाऊन असल्याने एप्रिल आणि मे महिन्यात सारे काही बंद होते. यामुळे अर्थव्यवस्थाच ठप्प झाली होती. जूनमध्ये याला थोडा वेग आला होता. यामुळे रेटिंग एजन्सी आणि अर्थतज्ज्ञांनी जून तिमाहीमध्ये जीडीपीदरात 16 ते 25 टक्के घट होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला होता. 

कृषीवगळता अन्य सर्वच क्षेत्रांना बसला मोठा फटका 
देशाच्या कृषिक्षेत्राने या तिमाहीत ३.४ टक्के एवढी वाढ दिली आहे. मागील वर्षी ही वाढ ३ टक्के एवढी होती. सर्वाधिक फटका बांधकाम क्षेत्राला बसला आहे. हे क्षेत्र यंदा मात्र ५०.३ टक्क्यांनी घसरले आहे. उत्पादन क्षेत्रातही ३९.३ टक्क्यांनी घट झाली आहे. खाण क्षेत्र (२३.३ टक्के), ऊर्जा क्षेत्र (७ टक्के), व्यापार, हॉटेल, परिवहन, दळण वळण आणि सेवा क्षेत्रामध्ये ४७ टक्क्यांनी घट झाली आहे. आर्थिक क्षेत्र तसेच स्थावर मालमत्ता यामध्ये ५.३ टक्के तर सामान्य प्रशासन, संरक्षण आणि अन्य सेवांच्या क्षेत्रात १०.३ टक्के अशी घट झाली आहे.
 

Web Title: congress priyanka gandhi vadra attacks modi government on gdp data

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.