130 कोटी लोकसंख्येच्या देशात फक्त 30 हजार व्हेंटीलेटर्स?; काँग्रेसने मोदी सरकारकडे केल्या 10 मागण्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 09:30 AM2020-03-23T09:30:44+5:302020-03-23T09:40:04+5:30

देशातील डॉक्टर्स, नर्सेस आणि त्यांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सगळ्यांनाच अभिमान आहे. करोनाशी दोन हात करताना हे सगळेच अत्यावश्यक सेवा देत आहेत.

Congress Makes 10 Demands To PM Narendra Modi Government mac | 130 कोटी लोकसंख्येच्या देशात फक्त 30 हजार व्हेंटीलेटर्स?; काँग्रेसने मोदी सरकारकडे केल्या 10 मागण्या 

130 कोटी लोकसंख्येच्या देशात फक्त 30 हजार व्हेंटीलेटर्स?; काँग्रेसने मोदी सरकारकडे केल्या 10 मागण्या 

Next

नवी दिल्ली: चीनसह संपूर्ण जगभरात दहशत निर्माण केलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतातही अनेक राज्यांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.  सध्या भारतात कोरोना रुग्णांची संख्या ३९६ वर पोहचली आहे तर आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. जगात ३ लाख ३० हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १४ हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. 

कोरोनावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. नरेंद्र मोदींच्या या आवाहनानंतर देशभरतून जनता कर्फ्यूला उत्सफूर्त प्रतिसाद नागरिकांनी दिला. तसेच ताळ्या, थाळ्या व घंटानाद करुन देशभरात अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या लोकांचे आभार देखील व्यक्त करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता काँग्रेसने 10 मोदी सरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत मोदी सरकारकडे मागणी केली आहे.

1. देशातील डॉक्टर्स, नर्सेस आणि त्यांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सगळ्यांनाच अभिमान आहे. करोनाशी दोन हात करताना हे सगळेच अत्यावश्यक सेवा देत आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या लोकांना आर्थिक मदत सरकारने दिली पाहिजे. याबाबत सरकारने तातडीने घोषणा करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

2. देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने रुग्णालयातील व्हेंटीलेटर्सची संख्या वाढवावी. देशाची लोकसंख्या 130 कोटी असताना फक्त 30 हजार व्हेंटीलेटर्स आपल्याकडे आहेत.

3. आरोग्य विभागात काम करणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी N95 मास्क, ग्लोव्ह्ज, फेस शील्ड, गॉगल्स, हँड कव्हर्स, रबराचे बूट, डिस्पोजेबल गाऊन उपलब्ध करुन द्यावेत जेणेकरुन काम करत असताना कोरोनापासून त्यांचा बचाव होण्यास मदत होईल.

4. देशभरात सॅनिटायझर्स, मास्क आणि लिक्विड यांचा काळा बाजार वाढला आहे. हा काळा बाजार करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई केली पाहिजे.

5. कोरोना व्हायरसच्या रुग्णांसाठी आयसोलेशन बेड्सची व्यवस्था करण्यात यावी.

6. आतापर्यत फक्त 16 हजार कोरोनाबाधित असणाऱ्या रुग्णांची चाचणी करण्यात आली आहे. त्यामुळे चाचणी करणाऱ्यांची संख्या वाढवण्याची खूप गरज आहे.

7. लघू आणि मध्यम व्यावसायिकांच कोरोनामुळे मोठं नुकसान झालं आहे . त्यामुळे सरकारने त्यांच्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावं.

8. कोरोनामुळे बळीराजावर मोठं संकट ओढावलं आहे. आधीच त्रस्त असलेला शेतकरी आणखी त्रस्त झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी.

9. कोरोनामुळे मध्यमवर्गीय लोक, पगारी काम करणाऱ्यांमधील जे लोक EMI भरत आहेत तो स्थगित करावा. जेणेकरुन या वर्गालाही काही प्रमाणात मदत होईल.

10. मजुरी करणारे, असंघटीत काम करणारे कामगारांना देखील केंद्र सरकारने मदतीची घोषणा करवी, अशी मागणी  रणदीप सुरजेवाला यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

Web Title: Congress Makes 10 Demands To PM Narendra Modi Government mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.