"नरेंद्र मोदींनी १६ कोटी बेरोजगारांची फसवणूक केली; देशाची हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 03:48 PM2022-04-24T15:48:51+5:302022-04-24T15:52:51+5:30

Congress And BJP : "डॉ. मनमोहनसिंह यांच्या काळात देशातील गरिबी, बेरोजगारी कमी झाली होती. मात्र, गेल्या ८ वर्षांत १९ कोटी युवकांच्या नोकऱ्या गेल्या."

Congress leaders Slams BJP And Modi Government over so many issues | "नरेंद्र मोदींनी १६ कोटी बेरोजगारांची फसवणूक केली; देशाची हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल"

"नरेंद्र मोदींनी १६ कोटी बेरोजगारांची फसवणूक केली; देशाची हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल"

Next

मुंबई - दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ८ वर्षांत १६ कोटी बेरोजगार युवकांची फसवणूक केली असल्याचा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी केला. २ कोटी युवकांना रोजगार तर सोडा त्यापेक्षा अधिक युवकांच्या नोकऱ्या गेल्या, त्यासाठी तुम्ही जबाबदार नाही का? असा सवाल त्यांनी मोदी सरकारला विचारला.  प्रदेश युवक काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलताना पाटील यांच्यासह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.वी.श्रीनिवास यांनी मोदी सरकार आणि भाजपवर चौफेर टीका केली. 

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार कुणाल राऊत यांनी शनिवारी टिळक भवन काँग्रेस मुख्यालयात स्वीकारल्यानंतर त्यांच्या पदग्रहणानिमित्त कामगार कल्याण मैदानात आयोजित युवक काँग्रेसच्या भव्य मेळाव्यास शनिवारी रात्री राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो युवकांनी हजेरी लावली. यावेळी पाटील  व अन्य नेत्यांनी भाजप आणि मोदी सरकारविरुद्ध लढा उभारण्याचे आवाहन काँग्रेसजनांना केले.

"डॉ. मनमोहनसिंह यांच्या काळात देशातील गरिबी, बेरोजगारी कमी झाली होती. मात्र, गेल्या ८ वर्षांत १९ कोटी युवकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यात ३० वर्षांपेक्षा कमी असलेल्या ५ कोटी युवकांचा समावेश आहे. मोदी यांनी सत्तेवर आल्यावर सर्वसामान्य नागरिकांच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. या लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले का?" असा सवालही पाटील यांनी विचारला. देशातील गरिबांची संख्या वाढत असताना अब्जाधीशांच्या संख्येतही वाढ होत चालली असल्याचे त्यांनी सांगितले. 

हुकूमशाहीकडे देशाची वाटचाल - पृथ्वीराज चव्हाण

देशाची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने सुरू असून त्यासाठी समतेचे वातावरण नष्ट केले जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.  अर्थव्यवस्थेतील अपयश लपवण्यासाठी देशात धार्मिक द्वेष निर्माण केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. महागाई, बेरोजगारी या प्रश्नावर राज्यव्यापी आंदोलन उभारा, शिबिरे घ्या, आम्ही खांद्याला खांदा लावून  तुमच्या सोबत आहोत, असेही ते म्हणाले. काँग्रेसची ताकद प्रत्येक गावात आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीपूर्वी गावागावात वातावरण तयार करा, असे आवाहन त्यांनी युवक काँग्रेसला केले.

केंद्र सरकारचे दुर्दैवी राजकारण - बाळासाहेब थोरात

महसूलमंत्री म्हणाले, केंद्र सरकारचे दुर्दैवी राजकारण सुरू आहे. लोकशाहीची प्रतिष्ठा जपण्याची वेळ आली आहे. महागाई, बेरोजगारी वाढली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देश चालवायचा असून नेतृत्व घडवण्याची जबाबदारी तरुणांवर आहे. त्यासाठी युवक काँग्रसने पुढाकार घेण्याची गरज आहे.

इंग्रजांप्रमाणे भाजपा देशाला गुलाम करत आहे - नाना पटोले

जात, धर्माच्या नावाखाली फूट पाडून इंग्रजांनी देशाला गुलाम केले. तीच पद्धत वापरून भाजप राजकारण करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. गरिबांना गरीब करणाऱ्या या भाजप सरकारला उखडून फेकून २०२४ मध्ये राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी बसविण्यासाठी  संघर्ष करा, असे आवाहन त्यांनी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना केले.

संविधानानुसारच हा देश चालेल – कन्हैयाकुमार

भारत देश हा हेलिकॉप्टरवरून उडणाऱ्यांचा आणि सायकलवरून फिरणाऱ्यांचा देखील आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार हा देश चालेल. कोणाचीही मनमानी आम्ही चालू देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे राष्ट्रीय नेते कन्हैयाकुमार यांनी दिला. ते म्हणाले, देशाचे पंतप्रधान भाषणातून बकवास करतात. त्यामुळे मी आजकाल बोलणे बंद केले आहे. संख्याबळ महत्वाचे नाही. धैर्य आणि साहस दाखविण्याची गरज आहे. संख्याबळ महत्वाचे असते तर छत्रपती शिवाजीमहाराज कधीही लढाई जिंकले नसते, असेही कन्हैयाकुमार म्हणाले.
 

Web Title: Congress leaders Slams BJP And Modi Government over so many issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.