'वंदे मातरम्'चे काँग्रेसने तुकडे केले, तुष्टीकरणाचे राजकारण सुरूच : मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 05:28 IST2025-12-09T05:27:34+5:302025-12-09T05:28:33+5:30
'वंदे मातरम्'वर संसदेत विशेष चर्चेला सुरुवात

'वंदे मातरम्'चे काँग्रेसने तुकडे केले, तुष्टीकरणाचे राजकारण सुरूच : मोदी
नवी दिल्ली : सामाजिक सलोख्याच्या नावाखाली काँग्रेसने राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम्'चे तुकडे केले. तेच तुष्टीकरणाचे राजकारण काँग्रेस आजही करत असल्याचा आरोप सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केला. 'वंदे मातरम्' या गीताच्या १५० व्या वर्षपूर्ती निमित्त विशेष चर्चेत ते बोलत होते.
या चर्चेत मोदी यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावरही निशाणा साधला. 'वंदे मातरम्' हे गीत मुस्लिमांना विरोध करू शकते, असे नेहरूंना वाटत होते. त्या संदर्भात नेहरूंनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पत्र लिहिले. यात 'वंदे मातरम्'मुळे मुस्लिमांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. हे मत 'वंदे मातरम्'ला मोहम्मद अली जिना यांनी विरोध केल्यानंतर त्यांचे झाले होते, असा दावा मोदी यांनी केला.
'वंदे मातरम्'च्या मंत्राने देशाला शक्ती, प्रेरणा दिली
काँग्रेसने मुस्लिम लीगसमोर गुडघे टेकले, तुष्टीकरण केले. म. गांधींनी १९०५ मध्येच 'वंदे मातरम्' देशभर लोकप्रिय झाल्याचे लिहून ठेवले होते. तरीही त्याच्यावर अन्याय का झाला?
असे कोणते प्रवाह होते जे म. गांधी आणि 'वंदे मातरम्'ला विरोध करत होते? 'वंदे मातरम्'च्या शताब्दीवेळी देशात आणीबाणी आणली गेली व राज्यघटनेचा गळा दाबला गेला.
स्वातंत्र्याच्या लढ्यात 'वंदे मातरम्' या मंत्राने संपूर्ण देशाला शक्ती आणि प्रेरणा दिली, असेही मोदी म्हणाले.
बंगालच्या निवडणुका जवळ येत असल्याने चर्चा : प्रियांका गांधींचा आरोप
काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी पंतप्रधानांच्या भाषणावर जोरदार टीका केली. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका जवळ असल्याने सरकार 'वंदे मातरम्'वर चर्चा घडवत असून लोकांच्या समस्यांवरून लक्ष विचलित करण्याचा त्यांचा हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला.
तुम्ही भूतकाळात डोकं खुपसून ठेवायला लावू इच्छिता कारण सरकारला वर्तमान व भविष्यकाळात पाहायचे नाही, असेही त्या म्हणाल्या.