काँग्रेसनं PMNRF चा पैसा राजीव गांधी फाऊंडेशनमध्ये वळवला; भाजपा अध्यक्षांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 10:57 AM2020-06-26T10:57:16+5:302020-06-26T10:59:02+5:30

शाही घराण्यानं देशाच्या जनतेचा पैसा परस्पर वळवला, त्यांनी देशाची माफी मागावी; भाजपा अध्यक्षांची मागणी

congress diverts Pmnrf Donation Money To Rajiv Gandhi Foundation says Bjp Chief Jp Nadda | काँग्रेसनं PMNRF चा पैसा राजीव गांधी फाऊंडेशनमध्ये वळवला; भाजपा अध्यक्षांचा गंभीर आरोप

काँग्रेसनं PMNRF चा पैसा राजीव गांधी फाऊंडेशनमध्ये वळवला; भाजपा अध्यक्षांचा गंभीर आरोप

Next

नवी दिल्‍ली: काँग्रेसनं पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतील (PMNRF)  रक्कम राजीव गांधी फाऊंडेशनकडे (RGF) वळवल्याचा आरोप भाजपाचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी केला आहे. नड्डा यांनी थेट काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींवर निशाणा साधला आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात PMNRF मध्ये जमा झालेला निधी राजीव गांधी फाऊंडेशनमध्ये वळवण्यात आला. PMNRF च्या बोर्डवर कोण होतं? श्रीमती सोनिया गांधी होत्या. राजीव गांधी फाऊंडेशनच्या चेअरमन कोण आहेत? सोनिया गांधीच आहेत. त्यांनी नैतिकता खुंटीवर टांगली आणि पारदर्शकतेचा तर विचारही केला नाही, अशा शब्दांत नड्डा यांनी सोनिया गांधींवर हल्लाबोल केला.







देशाची लूट केल्याबद्दल शाही घराण्यानं देशाची माफी मागावी, अशी मागणी नड्डा यांनी केली. 'लोकांनी त्यांच्या कष्टाचा पैसा देशवासीयांच्या कामी यावा या हेतूनं PMNRF मध्ये जमा केला. मात्र हा पैसा एका कुटुंबाच्या फाऊंडेशनमध्ये वळता करण्यात आला. हा देशातील जनतेसोबत करण्यात आलेला विश्वासघात आहे. एका कुटुंबाच्या लालसेपोटी देशाचं नुकसान झालं. काँग्रेसच्या शाही घराण्यानं त्यांच्या वैयक्तीक स्वार्थासाठी लूट केली. याबद्दल त्यांनी देशाची माफी मागावी,' अशी मागणी भाजपा अध्यक्षांनी केली.




PMNRF म्हणजे काय? 
पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी पूर्णपणे जनतेच्या पैशांवर चालतो. त्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नसते. देशाची जनता यामध्ये दान करते. त्यावर कोणताही कर लागत नाही. पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतील रक्कम आपत्ती काळात गरजूंसाठी वापरली जाते. 

राजीव गांधी फाऊंडेशन नेमकं काय करते?
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावानं १९९१ मध्ये फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. या फाऊंडेशनच्या बोर्डवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचा समावेश आहे. आरोग्य, साक्षरता, विज्ञान, संशोधन, महिला आणि बाल कल्याण यासाठी फाऊंडेशनच्या काम करत असल्याची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Web Title: congress diverts Pmnrf Donation Money To Rajiv Gandhi Foundation says Bjp Chief Jp Nadda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.