Congress is defeated by Rahul Yogi; Ramdev Baba's claim | राहुल योग करत नसल्याने काँग्रेसचा पराभव; रामदेव बाबांचा दावा
राहुल योग करत नसल्याने काँग्रेसचा पराभव; रामदेव बाबांचा दावा

मुंबई: काँग्रेसचे सध्याचे नेतृत्व योग करत नसल्याने काँग्रेसचा पराभव झाला, असा दावा योगगुरू बाबा रामदेव यांनी येथे केला.
आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी बाबा रामदेव यांनी बुधवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी योगासनंही सादर केली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी नियमित योग करतात. माजी पंतप्रधान नेहरू व इंदिराजीही कुणाच्या नकळत योग करायचे. मात्र काँग्रेसची नंतरची पिढी योगापासून दूर गेली व तिथेच त्यांची राजकारणातील गणितं बिघडली, असा टोला रामदेव यांनी लगावला. योग केल्याने ‘अच्छे दिन’ येतात असा दावाही त्यांनी केला.

यावर्षी आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त २१ जून रोजी मुख्य कार्यक्रम नांदेड येथे होणार असून मुख्यमंत्री फडणवीस व बाबा रामदेव उपस्थित राहाणार आहेत, अशी माहिती शिक्षण व क्रीडा मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी दिली. प्रधानमंत्री मोदी यांच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस घोषित केला असून जगभरातील देश हा दिवस उत्साहाने साजरा करीत आहेत. स्वस्थ महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित नांदेड येथील कार्यक्रमास पतंजली योगपीठाचे सहकार्य मिळणार असून दीड लाखांपेक्षा अधिक लोकांना एकाचवेळी योगासने करता येतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस राज्यातील ३६ जिल्हा मुख्यालय, ३२२ तालुका मुख्यालय मिळून ३५८ ठिकाणी साजरा होईल. या योग दिनामध्ये प्रत्येक तालुक्यातील किमान ५ हजार विद्यार्थी सहभागी होतील, असे शेलार यांनी सांगितले.


Web Title: Congress is defeated by Rahul Yogi; Ramdev Baba's claim
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.