झोंबणाऱ्या थंडीनं भरलं कापरं, उत्तर भारतात थंडीची लाट; उत्तराखंड, हिमाचलमध्ये बर्फवृष्टीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 10:08 IST2025-12-07T10:02:54+5:302025-12-07T10:08:44+5:30
काश्मीरमध्ये तापमान गोठणबिंदूच्या खाली; बिहार-हरयाणात हुडहुडी, तर दक्षिण भारतात पाऊस

झोंबणाऱ्या थंडीनं भरलं कापरं, उत्तर भारतात थंडीची लाट; उत्तराखंड, हिमाचलमध्ये बर्फवृष्टीचा इशारा
नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीच्या लाटेने बहुतांश राज्यांत तापमानात कमालीची घट झाली असून, जम्मू-काश्मीर तर अक्षरश: गोठले आहे. या लाटेच्या परिणामी काश्मीरसह पर्वतीय भागांत बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, पठारी भागांत थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे.
दिल्लीपासून पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यांसाठी थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून उत्तर प्रदेशातही या लाटेचा परिणाम दिसू लागला आहे. या सर्व राज्यांत सकाळी व सायंकाळच्या सुमारास दाट धुके जाणवत असून, सरासरी तापमान ४ अंशांपर्यंत घटण्याची शक्यता आहे. उपरोक्त राज्यांत तापमान २ ते ४ अंशांपर्यंत उतरण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दिल्लीत हवेची गुणवत्ता अत्यंत वाईट
दिल्लीत शनिवारी किमान तापमान ६.८ अंश नोंदले गेले. तर, सापेक्ष आर्द्रता ९५ टक्के होती. दुसरीकडे हवेची गुणवत्ता ३३५ एक्यूआय (एअर क्वालिटी इंडेक्स) म्हणजे अत्यंत वाईट श्रेणीत होती. दिल्लीतील सर्वच ३६ केंद्रांवर प्रदूषणाची ही स्थिती होती.
अन् दक्षिणेत पाऊस
हवामानशास्त्र विभागानुसार दक्षिण भारतात येत्या दोन दिवसांत पावसाचा अंदाज असून लक्षद्वीप-अंदमान बेटांवरही पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रातही कडाका, तापमान घटणार
आयएमडीनुसार ७ ते ११ डिसेंबरदरम्यान उत्तर भारतात थंडीच्या लाटेची शक्यता पाहता मध्य प्रदेश व विदर्भात तापमानात मोठी घट होऊ शकते.
याच्या परिणामी महाराष्ट्रात किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता आहे. विशेषत: पश्चिम व मध्य महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक जाणवेल.
असा आहे ‘आयएमडी’चा इशारा
दिल्ली, उत्तर प्रदेशासह उत्तर भारतातील बहुतांश भागांत ७ व ८ डिसेंबर रोजी तापमानात घट होईल. सरासरीपेक्षा तापमान कमी होऊन धुक्याचे साम्राज्य असेल. यात दृष्यमानता अत्यंत कमी होण्याची शक्यता आहे. विशेषत: दिल्ली, चंडीगड व हरियाणात याचा परिणाम अधिक जाणवेल. वाहतुकीत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला स्थानिक प्रशासनांने दिला आहे.