वीज गेल्याने मेट्रो बोगद्यात अडकली; प्रवाशांना सकाळीच ५०० मीटर ट्रॅकवरून करावी लागली पायपीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 18:44 IST2025-12-02T18:22:01+5:302025-12-02T18:44:35+5:30
चेन्नई मेट्रोमध्ये सकाळीच तांत्रिक बिघाड झाला आणि ती सबवेमध्ये अडकली.

वीज गेल्याने मेट्रो बोगद्यात अडकली; प्रवाशांना सकाळीच ५०० मीटर ट्रॅकवरून करावी लागली पायपीट
Chennai Metro: मंगळवारी सकाळी चेन्नई मेट्रोच्या ब्लू लाईनवरील प्रवाशांना एका अनपेक्षित आणि त्रासदायक अनुभवाला सामोरे जावे लागले. विमको नगर डेपोच्या दिशेने जाणारी मेट्रो ट्रेन अचानक मध्यवर्ती सबवेत अडकल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. महत्त्वाचे म्हणजे कार्यालयीन वेळेत ही घटना घडल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला.
सेंट्रल मेट्रो स्टेशन आणि हाय कोर्ट स्टेशनच्या दरम्यान ही ट्रेन अचानक थांबली. तांत्रिक बिघाडामुळे केवळ ट्रेन थांबली नाही, तर ट्रेनमधील वीजपुरवठाही खंडित झाला. यामुळे मेट्रोमध्ये त्वरित अंधार पसरला आणि एसीही बंद पडल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. ट्रेनमध्ये शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रेलिंग पकडून ५०० मीटर चालावं लागलं
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन १० मिनिटे अंधारात अडकल्यानंतर, मेट्रो अधिकाऱ्यांनी एक घोषणा केली. या घोषणेमध्ये प्रवाशांना जवळच असलेल्या हाय कोर्ट स्टेशनपर्यंत चालत जाण्याची सूचना करण्यात आली. प्रवाशांना नाइलाजाने ट्रेनमधून उतरून बोगद्यातून सुमारे ५०० मीटर अंतर रेल्वे ट्रॅकवरून चालावे लागले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रवासी रेलिंगला पकडून रांगेत बोगद्यातून बाहेर पडताना दिसत आहेत. प्रवाशांसाठी ही मॉर्निंग वॉक अनपेक्षित आणि धोकादायक होती.
चेन्नई मेट्रो रेलने नंतर एक्सवर माहिती दिली की, ही समस्या पॉवर आउटेज किंवा तांत्रिक बिघाडामुळे उद्भवली होती. प्रवाशांच्या तक्रारीनंतर तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्त करण्यात आला आहे. चेन्नई मेट्रो रेलने नंतर दुसऱ्या एका ट्विटमध्ये माहिती दिली की, ब्लू लाईनवरील आणि ग्रीन लाईनवरील मेट्रो सेवा आता सामान्य वेळापत्रकानुसार सुरू झाली आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला आहे.