सीबीएसईचा फाॅर्म्युला ठरला, राज्य शिक्षण मंडळाचा कधी ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 05:35 AM2021-05-04T05:35:59+5:302021-05-04T05:36:24+5:30

विद्यार्थी, पालकांपुढे प्रश्नचिन्ह; दहावीचा निकाल वैयक्तिक प्रगतीनुसार घोषित करा, शिक्षकांचे मत

CBSE's formula decided, when will it be for State Board of Education? | सीबीएसईचा फाॅर्म्युला ठरला, राज्य शिक्षण मंडळाचा कधी ठरणार?

सीबीएसईचा फाॅर्म्युला ठरला, राज्य शिक्षण मंडळाचा कधी ठरणार?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सीबीएसई मंडळाने दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी पद्धत आणि निकालाची संभाव्य तारीख जाहीर केली. मात्र, अद्याप राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनसंदर्भात काहीच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे हा  फाॅर्म्युला कधी ठरणार, असा प्रश्न विद्यार्थी, पालकांकडून उपस्थित केला जात आहे. 
या पार्श्वभूमीवर शाळास्तरावर यंदाच्या दहावीच्या मूल्यमापनाची जबाबदारी सोपवावी, विद्यार्थ्यांच्या मागील काही वर्षांतील वैयक्तिक प्रगतीचा आलेख लक्षात घेऊन निकाल घोषित करावा, असे मत मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी मांडले.
सीबीएसई मंडळाप्रमाणेच राज्य मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापनाच्या पद्धतीचा अवलंब होणार का, याकडे राज्यातील १६ लाख विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. राज्य शिक्षण मंडळाला लवकरात लवकर स्वतःची अंतर्गत मूल्यमापन पद्धत व निकष जाहीर करावेच लागतील, तरच पुढील शैक्षणिक वर्ष वेळेत मार्गी लागू शकेल, असे मत शिक्षकांनी मांडले.

सीबीएसई मंडळाच्या शाळेतील विद्यार्थी, पालक सधन वर्गातील आहेत. मोबाइल, इंटरनेटची उपलब्धता असल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांची ऑनलाइन चाचणी, सहामाही परीक्षा झाली आहे. ऑनलाइन परीक्षा घेऊन व वेगवेगळ्या प्रकल्प देऊन मूल्यमापन झाले आहे. त्यामुळे त्यांचे निकाल तयार करणे या शाळेला सोपे जाणार असून, त्यांची पद्धती राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना तंतोतंत लागू होऊच शकत नसल्याच्या प्रतिक्रिया शिक्षक देत आहेत.
राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना पूर्ण वर्षभर कुठल्याही प्रकारच्या अधिकृत ऑनलाइन परीक्षा देता आल्या नाहीत, तसेच शहरी भागात १ली ते १० पर्यंत ४० ते ५० टक्केच विद्यार्थी या ऑनलाइन शिक्षणात सहभागी झाल्याचे अनेक सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करणार? ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची स्थिती याहून वाईट असून, त्या विद्यार्थ्यांना गुण कसे देणार, यांसारखे अनेक प्रश्न शिक्षक स्वतःच उपस्थित करत आहेत. या सगळ्यात दहावीच्या विद्यार्थ्यांचा गेल्या मागील तीन वर्षाचा प्रत्येक विद्यार्थ्यांचा निकाल पाहून, त्याचे सरासरी गुण काढले, तर या विद्यार्थ्यांचे काही अंशी याेग्य मूल्यमापन करता येईल, तसेच त्यामुळे खोटे गुण न देता, कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही, असे कुर्ल्याच्या शिशु विकास मंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक वेताळ यांनी सांगितले.

मागील वर्षाशी तुलना करणे अशक्य!
शाळास्तरावर अंतर्गत मूल्यमापनाचा निर्णय सोपा असला, तरी अनेक विद्यार्थी, पालकांनी याला विराेध केला. हा पर्याय खरेच गुणवत्तेला योग्य न्याय देऊ शकेल का, विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा म्हणून यंदा केलेली मेहनत परिश्रम याची मागील वर्षाशी तुलना होऊ शकत नाही. अनेक शाळांमधून शिक्षक, शाळेकडून निवडक विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

Web Title: CBSE's formula decided, when will it be for State Board of Education?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.