RSS मुख्यालयाच्या पार्किंगसाठी प्राचीन मंदिरावर बुलडोझर?; स्थानिकांचा आक्रोश, लोक संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 09:09 IST2025-12-02T09:08:54+5:302025-12-02T09:09:28+5:30
गेली अनेक दशके या मंदिर परिसरात कुटुंब राहतात, परंतु आजपर्यंत त्यांना कुठल्याही यंत्रणेने रोखले नाही मात्र आरएसएसचं केशव कुंज येथे नवीन मुख्यालय बनल्यानंतर अचानक या परिसरावर बुलडोझर फिरवण्यात आला.

RSS मुख्यालयाच्या पार्किंगसाठी प्राचीन मंदिरावर बुलडोझर?; स्थानिकांचा आक्रोश, लोक संतापले
नवी दिल्ली - शहरातील झंडेवालान परिसरात प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तोडक कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात स्थानिकांमध्ये आक्रोश पसरला आहे. बाबा पीर रतन नाथ या प्राचीन मंदिर परिसरात बुलडोझर चालवून लंगर हॉल, बाग आणि जवळपास १०० हून अधिक घरे तोडण्यात आली. हा संपूर्ण परिसर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केशव कुंज मुख्यालयाच्या शेजारी आहे. त्यामुळेच इथल्या लोकांमध्ये संताप दिसून येत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, या प्राचीन मंदिराचा इतिहास ८०० वर्षाहून अधिक जुना आहे. १९४७ च्या फाळणीनंतर बाबा रतन नाथ पेशावरहून दिल्ली आले होते. तेव्हापासून हे ठिकाण त्यांच्या नावाने ओळखले जाते. परंतु शनिवारी सकाळी अचानक प्रशासनाने जेसीबी, बुलडोझर चालवून संपूर्ण परिसर बेकायदेशीर बांधकाम असल्याचं सांगत कारवाई सुरू केली. ना इथल्या लोकांना कुठली नोटीस दिली, ना आधी याची माहिती मिळाली त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. अचानक झालेल्या या तोडक कारवाईमुळे स्थानिकांमध्ये आक्रोश पसरला.
RSS मुख्यालयासाठी रस्ता अन् पार्किंगसाठी कारवाई?
गेली अनेक दशके या मंदिर परिसरात कुटुंब राहतात, परंतु आजपर्यंत त्यांना कुठल्याही यंत्रणेने रोखले नाही मात्र आरएसएसचं केशव कुंज येथे नवीन मुख्यालय बनल्यानंतर अचानक या परिसरावर बुलडोझर फिरवण्यात आला. त्यामुळे आरएसएसच्या कार्यालयासाठी रस्ता आणि पार्किंग करण्यासाठी हा परिसर खाली करण्यात येत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. जेव्हा ही तोडक कारवाई सुरू होती तेव्हा स्थानिकांची संख्या पाहता सुरक्षा जवानही मोठ्या संख्येने तिथे होते. लोकांची घरे, दुकाने, दीर्घकाळापासून असलेले आश्रमगृह काही क्षणात उद्ध्वस्त करण्यात आले.
Delhi: Delhi Municipal Corporation conducts demolition drive targeting illegal constructions near Jhandewalan Temple and the RSS office in Karol Bagh; plots had been vacated in advance. pic.twitter.com/wsQtIM03qe
— IANS (@ians_india) November 29, 2025
लोकांनी मंदिराला जमीन दान केली होती, स्थानिकांचा दावा
दरम्यान, जवळपास ८० वर्षापूर्वी इथल्या स्थानिकांनी ही जमीन बाबा रतन नाथ यांच्या नावावर केली होती. तेव्हापासून इथं वस्ती आहे. लोक शांततेत राहतात. मात्र अचानक प्रशासनाने कुठलीही नोटीस न बजावता लोकांची घरे तोडली हा अन्याय असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. हायकोर्टाने स्थगिती दिली असताना प्रशासनाने ही कारवाई केली असा आरोप स्थानिक करत आहेत. आरएसएस मुख्यालय इथं बांधण्यात आले. मात्र त्यानंतर कार्यालयाच्या बाजूची जागाही आमची आहे असं सांगत स्थानिकांवर दबाव टाकण्यात आला. लोकांना धमकावण्यात आले असा आरोप स्थानिकांनी केला.