भाजपामुळे देश लाजिरवाण्या परिस्थितीत- अरुंधती रॉय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 06:18 PM2019-10-15T18:18:42+5:302019-10-15T18:19:17+5:30

भाजपाने सत्ता मिळवल्यापासून देशाचे केवळ आर्थिकच नाही, तर सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तात्त्विक नुकसान झाले

BJP shame on country - Arundhati Roy | भाजपामुळे देश लाजिरवाण्या परिस्थितीत- अरुंधती रॉय

भाजपामुळे देश लाजिरवाण्या परिस्थितीत- अरुंधती रॉय

Next

नवी दिल्ली : भाजपाने सत्ता मिळवल्यापासून देशाचे केवळ आर्थिकच नाही, तर सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तात्विक नुकसान झाले असून, त्यामुळे देश सध्या लाजिरवाण्या परिस्थितीत असल्याचे सांगत ज्येष्ठ लेखिका अरुंधती रॉय यांनी मंगळवारी जंतरमंतरवर आयोजित आंदोलनादरम्यान केंद्र सरकारवर सडकून टीका केली.

तीन वर्षांपूर्वी जेएनयूमधून बेपत्ता झालेला नजीब अहमद या विद्यार्थ्याचा शोध घेण्यात दिल्ली पोलिसांसह सीबीआय आणि एनआयए या सरकारी संस्था अपयशी ठरल्यामुळे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून जंतरमंतरवर मंगळवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला सुमारे चारशेहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. तसेच नजीबची आई फातिमा नफीस, गौरी लंकेश यांची बहिण कविता लंकेश, मॉब लिंचिंगमध्ये मारले गेलेला तबरेझ अन्सारी याची पत्नी शैस्ता परवीन आणि उत्तर प्रदेशातील हिंसाचारात मारले गेलेले पोलीस अधिकारी सुबोध कुमार यांच्या पत्नी रजनी सिंग यावेळी उपस्थित होत्या.

यावेळी रॉय म्हणाल्या की, भाजपच्या काळात आर्थिकदृष्ट्या देश पिछाडीवर गेलेलाच आहे. मात्र, न्यायव्यवस्था, शिक्षण, पत्रकारिता, मानवाधिकार, संरक्षण या सर्वच क्षेत्रात देशाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. हिंदुत्ववादी विचार पसरवण्यासाठी सर्व पातळ्यांवर नियंत्रण ठेवण्यात आलेले आहे. जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाला लक्ष्य केले जात आहे. देशातील सध्याचे वातावरण लाजीरवाणे असून अशावेळी आपला देश महान ठरत नाही. संविधानानुसार देशाचा राज्यकारभार सुरू झाला तर भारत पुन्हा महान ठरेल पण सध्याची परिस्थिती भीषण आहे. पुढील काळात हे सरकार राष्ट्रीय नागरिकत्व कायदा लागू करेल, अशी शक्यताही अरुंधती रॉय यांनी व्यक्त केली.

जेएनयूएसयूच्या अध्यक्षा जैशे घोष म्हणाल्या की, वसतीगृहात घुसलेल्या टोळक्याने नजीबला बेदम मारहाण केली. यावेळी सुरक्षा रक्षक उपस्थित असतानाही त्यांनी मध्यस्ती केली नाही. त्यानंतर नजीब बेपत्ता झाला. मात्र, आजपर्यंत नजीबचा शोध लागलेला नाही. सीबीआय, दिल्ली पोलीस यांनी कोणताही शोध घेतलेला नाही. पुढील काळात गृह मंत्रालय, संसदेवर आम्ही मोर्चा नेणार आहोत. यावेळी आंदोलकांनी साथी नजीब को ढुंड के लाओ, आम्मी तुम संघर्ष करो-हम तुम्हारे साथ है, वी वॉन्ट नजीब, इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. न्यायासाठी अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष करणार असल्याचे सांगताना  नजीबची आई फातिमा यांना यावेळी अश्रू आवरता आले नाहीत.

Web Title: BJP shame on country - Arundhati Roy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.