"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 19:05 IST2025-12-09T19:03:09+5:302025-12-09T19:05:35+5:30
BJP MP Nishikant Dubey: संघ स्वयंसेवक असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे.

"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर
BJP MP Nishikant Dubey: संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. वंदे मातरम् मुद्द्यावर दोन्ही सभागृहात चर्चा सुरू असून, लोकसभेत मतचोरीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मतचोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक आयोग, निवडणूक आयुक्त आणि निवडणूक प्रक्रिया यावर अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख करत निशाणा साधला. राहुल गांधी यांच्या टीकेला भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी प्रत्युत्तर दिले.
मी प्रश्न विचारू इच्छितो, ज्यामुळे हे स्पष्ट होईल की, भाजपा भारताच्या लोकशाहीला हानी पोहोचवण्यासाठी निवडणूक आयोगाला हाताशी धरत आहे. निवडणूक आयोगाचा वापर करत आहे. पहिला प्रश्न, निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढून टाकण्यात आले? ते त्या बैठकांना का नाहीत? मी तिथे होतो. हा तथाकथित लोकशाही निर्णय आहे. एका बाजूला पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह. दुसरीकडे विरोधी पक्षनेते. परंतु, आम्हाला तिथे काहीच बोलता येत नाही. ते जे ठरवतात तेच घडते. पंतप्रधान आणि अमित शाह निवडणूक आयुक्तांची निवड करण्यास इतके उत्सुक का आहेत? असा सवालही राहुल गांधी यांनी केला. तसेच मतचोरी हे सर्वांत मोठे देश विरोधी कृत्य आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
काँग्रेसनेच संविधान कलंकित केले
राहुल गांधी यांच्या आरोपांना भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी प्रत्युत्तर दिले. काँग्रेसने भारताच्या संविधानाला कलंकित केले आहे; इंदिरा गांधी यांनीच मत चोरी करून रायबरेली येथे विजय मिळवला. संघ स्वयंसेवक असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे निशिकांत दुबे यांनी सांगितले. तसेच सन १९८७ मध्ये एका पायलट प्रोजेक्ट अंतर्गत माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनीच देशात ईव्हीएम मशीन आणली होती, याची आठवण निशिकांत दुबे यांनी करून दिली. दुसरीकडे, भाजपाच्या संजय जयस्वाल यांनी राहुल गांधी यांचे 'मत चोरी'चा मुद्दा आणल्याबाबत आभार मानले. राहुल गांधी यांनी मत चोरीच्या मुद्द्यावरून केलेल्या आरोपांमुळे एनडीएचा बिहार विजय झाला, असे म्हटले आहे.
दरम्यान, देशातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू हे आरएसएसचे आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील सर्व संस्थांवर नियंत्रण आणू पाहत आहे. मी काहीही चुकीचे बोलत नाही. संघाने शैक्षणिक संस्था ताब्यात घेतल्या आहेत. कुलगुरूंची नियुक्ती गुणवत्तेवर नव्हे तर एका संस्थेशी संलग्नतेवर आधारित करण्यात आली आहे. CBI आणि ED एकाच संस्थेशी संबंधित व्यक्तींनी ताब्यात घेतले आहेत. देशातील निवडणुका नियंत्रित करणारी तिसरी संस्था निवडणूक आयोग दुसऱ्या संस्थेद्वारे नियंत्रित केली जाते. माझ्याकडे याचे पुरावे आहेत, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.