Hathras Gangrape : "मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार", भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 08:40 AM2020-10-04T08:40:03+5:302020-10-04T08:48:13+5:30

Hathras Gangrape : भाजपाच्या एका नेत्याने वादग्रस्त विधान केलं आहे. मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होत असल्याचं धक्कादायक विधान केलं आहे

bjp mla surendra singh controversial statment on rape incident hathras case | Hathras Gangrape : "मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार", भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान 

Hathras Gangrape : "मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार", भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान 

Next

नवी दिल्ली -  हाथरसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. याच दरम्यान भाजपाच्या एका नेत्याने वादग्रस्त विधान केलं आहे. मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होत असल्याचं धक्कादायक विधान केलं आहे. उत्तर प्रदेशच्या बलिया विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी ही मुक्ताफळं उधळली आहेत. हाथरस प्रकरणावर प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

सुरेंद्र सिंह आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. "आपल्या मुलींना संस्कारीत वातावरणात राहण्याच्या, चालण्याच्या आणि एक शालीन व्यवहार दर्शवण्याच्या पद्धती शिकवणं हा आई-वडिलांचा धर्म आहे. अशा घटना चांगल्या संस्कारांनीच थांबवल्या जाऊ शकतात. अशा घटनांना शासन आणि तलवारी रोखू शकत नाहीत" असं सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये रामराज्याचा दावा केला जात असताना बलात्कारासारख्या घटना समोर येत आहेत. यामागचं कारण काय? असा प्रश्न सिंह यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. 

"या घटना केवळ चांगल्या संस्कारांनीच रोखल्या जाऊ शकतात"

"मी आमदारासोबतच एक शिक्षकही आहे. या घटना केवळ चांगल्या संस्कारांनीच रोखल्या जाऊ शकतात. शासन आणि तलवार त्यांना रोखू शकत नाही. आपल्या मुलींवर संस्कार करणं हा सर्वांचा धर्म आहे. माझा धर्म आहे, सरकारचा धर्म आहे. कुटुंबाचाही हा धर्म आहे. जिथे सरकारचा धर्म संरक्षण करण्याचा आहे. तिथे मुलांना संस्कार देणं हा कुटुंबांचा धर्म आहे. सरकार आणि संस्कार मिळून देशाला सुंदर रुप देऊ शकतात. त्यासाठी दुसरं कोणीही समोर येणार नाही" असंही देखील भाजपाच्या आमदाराने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

‘हाथरस’चा तपास सीबीआयकडे; योगी सरकारची घोषणा

उत्तर प्रदेश पोलिसांवर अथवा सीबीआयवर आमचा विश्वास नसून, आमच्या मुलीवर झालेला बलात्कार आणि तिचा मृत्यू यांची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी शनिवारी केली. त्यानंतर काही मिनिटांतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात येत असल्याची घोषणा केली.मृत मुलीच्या कुटुंबीयांनी कधीही सीबीआय चौकशीची मागणी केली नव्हती. किंबहुना आम्हाला सीबीआय तपास नको, आमचा त्या यंत्रणेवर विश्वास नाही, असे कुटुंबातील प्रत्येक जाण सांगत होता. तरीही सरकारने तपास सीबीआयकडे सोपविला आहे

"गांधी जयंतीच्या दिवशी उत्तर प्रदेशमध्ये लोकशाहीचे किळसवाणे वस्त्रहरण, मोदी धृतराष्ट्र झाले का?"

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिवशी उत्तर प्रदेश सरकारने सत्तेच्या धुंदीत लोकशाहीचे चालवलेले किळसवाणे वस्त्रहरण सर्व देश पाहत आहे अशा शब्दांत काँग्रेसने योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "महाभारतात देखील महिलेवर दुर्योधन, दु:शासन अत्याचार करत असताना धृतराष्ट्रासह सर्वजण हातावर हात धरून गप्प बसले होते. आज हाथरसमध्ये एका दलित परिवारातील मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या झाली आणि ते दाबण्यासाठी अजयकुमार बिश्त यांचे उत्तर प्रदेश सरकार बेफाम झाले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी धृतराष्ट्र झाले का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. 

 

Web Title: bjp mla surendra singh controversial statment on rape incident hathras case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.