BJP-allies in Jharkhand have fielded candidates against each other | झारखंडमध्ये भाजप-मित्रपक्षांनी उभे केले एकमेकांविरुद्ध उमेदवार
झारखंडमध्ये भाजप-मित्रपक्षांनी उभे केले एकमेकांविरुद्ध उमेदवार

नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपपासून फारकत घेतल्याचे पडसाद झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत उमटले आहेत. झारखंडमधील भाजप आणि मित्रपक्षांत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, ते एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे करीत आहेत.

१५ वर्षांपूर्वी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या झारखंड राज्याच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला होता.
८१ आमदार असलेल्या विधानसभेत भाजपला बहुमतासाठी फक्त ५ आमदार कमी पडले होते. राज्याचे तत्कालीन राज्यपाल सैयद सिबते राझी यांनी झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते शिबू सोरेन यांना सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिले. भाजपने आपले सर्व आमदार आणि पाच सहयोगी आमदार यांना अज्ञात स्थळी लपवून ठेवले. त्यात एक आमदार होते आॅल झारखंड स्टुटंडस् युनियनचे (एजेएसयू) सुदेश महातो.
सोरेन यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. त्यानंतर भाजपचे अर्जुन मुंडा मुख्यमंत्री झाले. नव्या सरकारमध्ये सर्वाधिक फायदा झाला तो महातो यांचा. महातो तेव्हापासून भाजपसोबत युती करून आहेत. यंदाच्या निवडणुकीतही महातो यांचा एजेएसयू पक्ष आणि भाजप यांच्यात युती असली तरी दोन्ही पक्षांत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या अविश्वासाला २0१४ ची विधानसभा निवडणूकही कारणीभूत आहे. या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील युतीला बहुमत तर मिळाले होते. तथापि, स्वत: महातो हे सिल्ली मतदारसंघातून पराभूत झाले होते. त्यातच आता महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकीनंतरच्या नव्या समीकरणांची भर पडली आहे. त्यातून महातो यांच्या एजेएसयूने चांगलाच धडा घेतल्याचे दिसून येत आहे. भाजपसोबत युती असली तरी ज्या ठिकाणी विजय मिळविणे शक्य आहे असे वाटते त्या ठिकाणी भाजप उमेदवारांच्या विरोधातही त्यांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. अशा ठिकाणी महातो यांनी इतर पक्षांनी उमेदवारी नाकारलेल्या नेत्यांना उमेदवारी दिली आहे. हरियाणातील जेजेपी नेते दुष्यंत चौटाला यांच्याप्रमाणे आपले आमदार वाढविण्याचे धोरण महातो यांनी स्वीकारले आहे. त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आल्यास किंगमेकर बनता येईल, अशी त्यांची खेळी आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने साथ सोडल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या चिंतेत झारखंडमध्ये भर पडली आहे. मुख्यमंत्री रघुबर दास यांनीही जास्तीत जास्त जागांवर उमेदवार देण्याचे धोरण ठेवले आहे.

भाजपची चौथी यादी जाहीर
विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने आपली चौथी यादी जाहीर केली आहे. केंद्रीय निवडणूक समितीने शनिवारी तीन उमेदवारांची नावे जाहीर केली. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी जाहीर केलेल्या या यादीत जुगसलाईमधून मोचीराम बाउरी, जगन्नाथपूरमधून सुधीर सुंडी आणि तमाड येथून रितादेवी मुंडा यांचा समावेश आहे. भाजपने एकूण ८१ जागांपैकी ७१ उमेदवारांची घोषणा आतापर्यंत केली आहे.

जदयुने जाहीर केले १२ उमेदवार
विधानसभा निवडणुकीसाठी जदयुने शनिवारी १२ उमेदवार जाहीर केले. यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सलखान मुर्मू आणि काँग्रेसचे माजी नेते बागून सुंबराई यांच्या मुलाचा समावेश आहे. मुर्मू यांना मझागावमधून तर, विमल कुमार सुंबारुई यांना चाईबासातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अन्य १० उमेदवार हे नवे चेहरे आहेत. नितीशकुमार यांचा जेडीयु स्वबळावर ही निवडणूक लढत आहे. आतापर्यंत त्यांनी २५ उमेदवार जाहीर केले आहेत.

Web Title: BJP-allies in Jharkhand have fielded candidates against each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.