तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 17:30 IST2025-11-14T17:30:16+5:302025-11-14T17:30:46+5:30
Bihar Assembly Election Votes: महाआघाडीत राजदने व्यक्तिगत स्तरावर सर्वाधिक जागा जिंकून आपले स्थान निश्चित केले असले तरी, संपूर्ण आघाडीला बहुमत मिळवता आले नाही.

तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी अनेक राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत. राजद नेते तेजस्वी प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. राजकीय विश्लेषकांच्या मते, या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे काँग्रेस पक्षाचा अत्यंत निराशाजनक 'स्ट्राइक रेट' आणि तेजस्वी यादव यांचा काँग्रेसवरील प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवणे हे असल्याचे सांगितले जात आहे.
महाआघाडीत राजदने व्यक्तिगत स्तरावर सर्वाधिक जागा जिंकून आपले स्थान निश्चित केले असले तरी, संपूर्ण आघाडीला बहुमत मिळवता आले नाही. राजदला मतदारांचा भाजपपेक्षाही जास्त पाठिंबा मिळाला आहे. परंतू, त्यांच्या जागा कमी आल्या आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार राजदला २२.७३ टक्के मतदान झाले आहे, तर भाजपला २०.८० टक्के मतदान झाले आहे. नितीशकुमार यांच्या जेडीयुला १८.८३ टक्के मतदान झाले आहे. देशपातळीवरील पक्ष काँग्रेसला केवळ 8.56 टक्के मते मिळाली आहेत. ही सर्वात निराशाजनक बाब ठरली आहे.
महाआघाडीमध्ये काँग्रेसला ६० हून अधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र, निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, काँग्रेस पक्षाने अत्यंत कमी जागांवर विजय मिळवला आहेच, परंतू मतदानही कमीच घेतले आहे. ज्या जागा काँग्रेसला देण्यात आल्या, त्यापैकी बहुतांश जागांवर काँग्रेसला मतदारांना आपल्याकडे वळवण्यात अपयश आल्याचे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
बिहारमध्ये भाजपा जवळपास ९६ जागांवर आघाडीवर आहे, तर जदयू ८४ जागांवर आघाडीवर आहे. परंतू. यांच्यापेक्षा कितीतरी मते जास्त मिळविणारा राजद मात्र २४ वरच अडकला आहे. याचाच अर्थ राजदला जिथे पडली तिथे खूप मते पडली आहेत, परंतू जिथे हवी होती तिथे कमी मते पडल्याने त्याचा फायदा भाजपा आणि जदयूला झालेला आहे. NDA ने २०० हून अधिक जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
तेजस्वींना आता काय करावे लागेल?
तेजस्वी यादव यांनी त्यांच्या 'जॉब्स' आणि 'युवा' या घोषणांच्या आधारावर राज्यात एक नवीन लाट निर्माण केली असली तरी, लालू प्रसाद यादव यांच्या जुन्या 'जंगलराज'च्या प्रतिमेपासून ते पूर्णपणे दूर राहू शकले नाहीत. तसेच, एका कमकुवत पक्षावर अधिक अवलंबून राहिल्याने त्यांना मोठा फटका बसला. या निकालानंतर तेजस्वी यादव यांना आता आपल्या पक्षाची संघटन क्षमता वाढवावी लागेल आणि भविष्यात मित्रपक्षांची निवड अधिक विचारपूर्वक करावी लागणार आहे.